रस्ता रुंदीकरण अडचणीत

रस्ता रुंदीकरण अडचणीत
Published on
पान एक मेन --------------- द्वारका ते नाशिक रोड रस्ता रुंदीकरण अडचणीत हरित लवादाच्या आदेशामुळे कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका ते नाशिक रोड दरम्यानचा ६.४ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग आता अधिक खडतर झाला आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने या कामासाठी २२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कामासाठी १६ निविदाधारक पात्र ठरले आहेत. दहा दिवसात कार्यारंभ आदेश देऊन काम सुरु करण्याचे नियोजन महापालिकेचे असले तरी, राष्ट्रीय हरित लवादाने डिसेंबरपर्यंत शहरांमध्ये वृक्षतोड करू नये, असे स्पष्ट आदेश दिल्याने रुंदीकरणाला ग्रहण लागले आहे. द्वारका ते नाशिक रोड दरम्यान एकूण ४५ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा रस्ता दहा पदरी असेल, ज्यात दोन सेवा रस्त्यांचा (सर्व्हिस रोड) समावेश असणार आहे. यासोबतच नंदिनी नदीवरील पुलाचेही रुंदीकरण केले जाणार आहे. या मार्गासाठी काही वर्षांपूर्वी दत्त मंदिर ते द्वारका दरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित होता. नंतर मेट्रो निओचे नियोजन आल्याने डबल डेकर उड्डाणपुलाचा निर्णय झाला. मात्र आर्टिलरी सेंटर आणि गांधीनगर येथील करन्सी नोट प्रेसच्या सुरक्षा कारणांमुळे परवानगी मिळाली नाही आणि प्रकल्प रेंगाळला. अखेर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर रस्ता रुंदीकरणाचा पर्याय पुढे करण्यात आला. महापालिकेला प्रतिसाद न मिळाल्याने केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने निविदा प्रक्रिया हाती घेतली. आता नुकत्याच निविदा उघडण्यात आल्या असून १६ कंत्राटदार पात्र झाले आहेत. ----------- संरक्षण विभागाच्या जागा आणि आता वृक्षतोड बंदी या रुंदीकरणात सर्वात मोठा अडसर हा भूसंपादनाचा आहे. या ६.४ किलोमीटर पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या आस्थापनांच्या मालमत्ता आहेत. यात आर्टिलरी सेंटर, गांधीनगर प्रेस, संरक्षण विभागाच्या जागा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या निवासी भागाचा समावेश आहे. केंद्रीय स्तरावर जागा हस्तांतरणासाठी बोलणी सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात जागा ताब्यात मिळाली तरी त्या ठिकाणी प्रथम संरक्षक भिंत बांधून द्यावी लागणार आहे. त्यामुळे आधीच या कामाला विलंब होण्याची चिन्हे होती. आता त्यात राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाने आणखी भर पडली आहे. लवादाने डिसेंबर अखेरपर्यंत कोणत्याही शहरात वृक्षतोड करू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, द्वारका ते नाशिक रोड या ६.४ किलोमीटरच्या महामार्गावर नेमकी किती झाडे आहेत, त्यातील किती झाडे बाधित होणार आहेत, याचे कोणतेही सर्वेक्षण अद्याप महापालिकेने केलेले नाही. -------------- कुंभमेळ्यापूर्वी रस्ता होणार का? नियमानुसार वृक्षतोड करायची असल्यास महापालिकेला प्रथम वृक्षगणना सर्वेक्षण करावे लागेल. त्यानंतर वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर वृक्षतोडीबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवाव्या लागतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष वृक्षतोड करण्यास किमान ३ ते ४ महिने लागतात. परंतु, आता डिसेंबरपर्यंत वृक्षतोडीलाच बंदी असल्याने ही प्रक्रिया जानेवारीनंतर सुरू होऊ शकेल. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी हा ४५ मीटरचा महामार्ग प्रत्यक्षात पूर्ण होणे दृष्टिपथात दिसत नाही. द्वारका ते नाशिक रोड दरम्यान महामार्गावरील तोड करावयाच्या वृक्षांचे सर्वेक्षण झालेले नाही. हरित लवादाने डिसेंबर अखेरपर्यंत वृक्षतोडीला बंदी घातली आहे. अद्यापपर्यंत वृक्षतोड किंवा सर्वेक्षणासंदर्भात प्रस्ताव आलेला नाही. -विवेक भदाणे, उद्यान निरीक्षक, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com