पान तीन सेंकड मेन
------------------------
04884
नाशिक : महापालिका आणि एनआरडीसी इंडिया यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना आयुक्त मनीषा खत्री आणि दीपा बगई. शेजारी महापौर हिमगौरी आडके, डॉ. संगीता नांदूरकर आदी.
पर्यावरणासंदर्भात महापालिकेचा सामंजस्य करार
''उष्णता रोधक'' योजना राबवणारे नाशिक पहिले शहर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : शहराच्या दोनशे चौरस किलोमीटर हद्दीतील वाढत्या तापमानावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि एनआरडीसी इंडिया लिमिटेड यांच्यात बुधवारी (ता.२) सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री, एनआरडीसी इंडियाच्या कंट्री हेड दीपा बगई यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार पुढील ५ वर्षांसाठी लागू असणार आहे. कराराचा उद्देश नाशिक शहरातील उष्णतेशी संबंधित धोके कमी करणे, शाश्वत शीतलीकरण उपाययोजना राबवणे आणि हवामान अनुकूलन क्षमता वाढवणे हा आहे.
कार्यक्रमास उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, नगरसेवक कोमल मेहरोलिया, शैलेश ढगे, गौरव गोवर्धने, सागर लामखेडे, नरेश पाटील यांच्यासह राहुल बोबे, मनोज धामणे, कोमल मोंढे आदी उपस्थित होते.
----------
कराराची वैशिष्ट्य़े
- उष्णता रोधक उपाययोजना: शहरातील वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा आणि आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन तांत्रिक आणि सल्लागार सहकार्य पुरवले जाईल.
- राज्यातील पहिले शहर: नाशिक हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे, जिथे अशा प्रकारे व्यापक स्वरूपात ''उष्णता रोधक'' योजना राबवली जात आहे.
- आयआयएम नागपूर - उत्कृष्टता केंद्र: महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आयआयएम नागपूर येथे जागतिक संशोधकांच्या सहकार्याने ''उत्कृष्टता केंद्र'' ची स्थापना केली आहे. हे केंद्र नागरी भागातील उष्णता कमी करण्यासाठी आणि संशोधनाधारित उपाययोजना आखण्यासाठी मोठे योगदान देत आहे.
- महापालिकेचे विशेष उपक्रम: नाशिक महापालिकेकडून पर्यावरण विभागामार्फत पर्जन्य जलसंचय आणि नागरी उष्णता बेट प्रभाव कमी करण्यासाठी विविध पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.
- कुंभमेळा नियोजन: कुंभमेळ्याच्या काळात भासणाऱ्या तीव्र उष्णतेचे आव्हान लक्षात घेऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर भागात शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांचे आराखडे कुंभाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विभागामार्फत तयार केले जातील.
- जुळी शहरे कार्यक्रम: नाशिक-सिंगापूर जुळी शहरे ज्ञान आदान-प्रदान कार्यक्रम आणि इतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उपक्रमांसाठी तांत्रिक मदत पुरवली जाईल.
- क्षमता बांधणी व जनजागृती: महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्थानिक संस्था आणि स्वयंसहाय्यता गटांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा व जनजागृती मोहिमा आयोजित केल्या जातील.
नाशिक हे महाराष्ट्रातील पहिले शहर आहे, जिथे हिट रिझिलिअन्स योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एनआरडीसीसोबतचे हे सहकार्य नाशिककरांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे ठरेल.
- हिमगौरी आडके, महापौर.
--------
नाशिकच्या नागरिकांच्या आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एनआरडीसीसोबतचे हे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरेल.
- मनीषा खत्री, आयुक्त.