मेनला क्लब करणे
---------------
समन्वयाअभावी मंडळांची बैठक फसली
अवघे ३० पदाधिकारी उपस्थित; प्रशासन, नगरसेवक धारेवर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : गणेशोत्सवाला अवघे चार दिवस शिल्लक असताना महापालिकेने आयोजित केलेल्या सार्वजनिक मंडळांच्या बैठकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. बुधवारची बैठक ऐनवेळी रद्द करून गुरुवारी घेतल्याने त्याची माहितीच बहुतांश मंडळांपर्यंत पोचली नाही. परिणामी शहरातील १२०० मंडळांपैकी केवळ तीस मंडळांचे प्रतिनिधी राजीव गांधी भवनातील बैठकीला हजर राहिले. या गोंधळावर सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेटे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत प्रशासन आणि नगरसेवकांनाही धारेवर धरले.
महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेटे यांनी मंडळांसमोरील अडचणींचा पाढाच वाचला. मंडळांच्या परवानगीसाठी सुरू केलेल्या एक खिडकी योजनेत महावितरणचा समावेश नसल्याबद्दल शेटे यांनी आक्षेप घेतला. वीज मीटर देण्यासाठी महावितरणकडून मंडळांची अडवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन दिवसांत मीटर न मिळाल्यास महावितरणवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. मंडळांना वीजबिलातून सूट देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही शेटे यांनी सांगितले. नगरसेवक होण्याची वाट ही सार्वजनिक मंडळांच्या कामातूनच जाते, त्यामुळे नगरसेवकांनी मंडळांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, अशा शब्दांत शेटे यांनी लोकप्रतिनिधींनाही सुनावले. अधिकारी आणि नगरसेवकांनी लक्ष घातल्यास उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. घाटांवर सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात आणि दान केलेल्या मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशा सूचना करणसिंग बावरी, गणेश बर्वे, मोहन ठाकरे, महेश कटके, बबलूसिंग परदेशी, गणेश अवनकर, हर्षद वाघ, सर्जेराव जाधव, व्ही. व्ही. उदावंत, पंकज रहाणे यांनी मांडल्या
-------
बैठकीत मांडलेले प्रमुख मुद्दे
* ८५ टक्के खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा फोल असून, बुजविलेले खड्डे पावसाने पुन्हा उघडे पडले आहेत, किमान मिरवणूक मार्ग तरी खड्डेमुक्त करावेत.
* सिंहस्थाच्या कामांमुळे गोदाघाटांवर विसर्जनात अडथळे येणार असल्याने विसर्जनासाठी उपलब्ध घाटांची यादी आधीच प्रसिद्ध करावी.
* विसर्जनस्थळी जीवरक्षक तैनात करावेत, गोदाघाटावरील मलबा हटवून स्वच्छता करावी आणि बंद असलेले हायमास्ट दिवे सुरू करावेत, अशी मागणी नगरसेवक शाहु खैरे यांनी केली.
* बी. डी. भालेकर मैदान आणि मिरवणूक मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
* मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवून स्वच्छता राखावी आणि लोंबकळणाऱ्या विद्युत तारा भूमिगत कराव्यात.
* पोलिस प्रशासनाने परवानगीसाठी ऑफलाइन पर्याय उपलब्ध करून द्यावा.
-----------------