सिंहस्थासाठी आणखी १,८०० कोटींचा निधी

सिंहस्थासाठी आणखी १,८०० कोटींचा निधी
Published on
लोगो : सिंहस्थ कुंभमेळा सिंहस्थासाठी आणखी १,८०० कोटींचा निधी शासनाकडून वितरणास मंजुरी; पायाभूत सुविधांच्या कामांना मिळणार गती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य शासनाने आणखी एक हजार ८०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केला असून, सिंहस्थाच्या आवश्यक कामांना या निधीमुळे गती मिळणार आहे. सिंहस्थासाठी प्रशासनाने सुमारे २४ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे. या आराखड्याला अद्याप औपचारिक मंजुरी मिळालेली नसली, तरी सिंहस्थ प्राधिकरणाच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात सुमारे ३० हजार कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात सिंहस्थासाठी टप्प्याटप्प्याने तीन हजार ९८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. त्यानंतर २०२६-२७ च्या पावसाळी अधिवेशनात आवश्यक कामांसाठी तीन हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली. त्यातील शिल्लक एक हजार ८०० कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्यानंतर नगरविकास विभागाने आता त्याबाबतचा आदेश काढला आहे. हा निधी सिंहस्थाच्या मंजूर उद्दिष्टांखालील आवश्यक कामांसाठीच खर्च करता येणार आहे. संबंधित कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेतल्यानंतरच निधी वितरित अथवा खर्च करता येईल. खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्रही शासनाला सादर करावे लागणार आहे. निधीच्या विनियोगाची जबाबदारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com