पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेचा पुढाकार
आरास स्पर्धा; विजेत्यांना १८ हजारांची पारितोषिके
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : श्री गणेशोत्सव २०२६ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घरगुती पर्यावरणपूरक आरास स्पर्धेचे आयोजन केले आहे. घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात यंदाही घरोघरी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. उत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा, उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान व्हावा आणि त्यातून इतर नागरिकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागासाठी तीनही निकष पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शाडू मातीपासून किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास आणि पर्यावरणपूरक पद्धतीने घरीच केलेले विसर्जन अशा तिन्ही बाबींची पूर्तता करणाऱ्या नागरिकांना स्पर्धेत भाग घेता येईल. श्री विसर्जन घरीच पर्यावरणपूरक पद्धतीने करणे आवश्यक राहील. निकष पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांमधून उत्कृष्ट तीन स्पर्धकांची निवड करून त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये, द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये असे पारितोषिकांचे स्वरूप राहील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी घरातील पर्यावरणपूरक श्रीमूर्ती प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक आरास आणि घरीच केलेल्या पर्यावरणपूरक श्रीविसर्जनाची छायाचित्रे health.nashikcorporation@gmail.com या ईमेलवर पाठवावीत. त्यानंतर संबंधित विभागीय अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरगुती आरासांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल समितीकडे सादर करतील. प्राप्त अहवालांची पडताळणी करून गठित समिती पारितोषिकांबाबत अंतिम निर्णय घेईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.