फोटो : B04929
नाशिक : सिद्धार्थ गोरे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन महापालिका आयुक्तांना देताना (डावीकडून) शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपचे गटनेते ॲड. श्याम बडोदे आणि शिवसेना (उबाठा) गटनेते केशव पोरजे.
जिंदाल कंपनीच्या निष्काळजीमुळे तरुणाचा बळी
चारही गटनेत्यांचा आरोप; ठेकेदारावर कठोर कारवाईची आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत थेट पाइपलाइन योजनेचे जिंदाल कंपनीमार्फत काम सुरू आहे. या कामादरम्यान रस्ते खोदाई करताना सूचना फलक, बॅरिकेडिंग, परावर्तक आणि प्रकाशव्यवस्था यांसारख्या सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करीत या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदार कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी चारही पक्षांच्या गटनेत्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिद्धार्थनगर येथील कृषीनगर जॉगिंग ट्रॅक परिसरात १२ सप्टेंबरला रात्री बाराच्या सुमारास सिद्धार्थ गोरे या तरुणाचा दुचाकी काळ्या पाईपवर आदळून दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावर आडवे टाकलेल्या पाईपमुळे हा अपघात झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. सिद्धार्थ गोरे यांच्या पश्चात पत्नी तसेच दोन वर्षे आणि सहा महिन्यांची मुलगी असून या घटनेमुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे. कामातील त्रुटी आणि विलंब यामुळे यापूर्वीच या कंपनीवर कारवाई करण्यात आली होती, मात्र तरीही कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नाही, असे गटनेत्यांनी निवेदनात नमूद केले आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा रोष महापालिकेवर येत असून नागरिक आर्थिक भरपाई आणि वारसांना महापालिका सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. यामुळे महापालिकेवर आर्थिक बोजा निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शहरातील कामांमध्ये निष्काळजीपणा दाखवणाऱ्या आणि सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या जिंदालसह इतर मक्तेदार कंपन्यांबाबत कठोर भूमिका घेऊन कायदेशीर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीचे गटनेते सीमा ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते केशव पोरजे, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते आणि भाजपाचे गटनेते ॲड. श्याम बडोदे यांच्या सह्या आहेत.