नव्या मिळकतींसाठी विभागनिहाय शिबिरे
महापौरांचे प्रशासनाला आदेश; कर विभागाच्या कामकाजावर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाचा भाग म्हणून मालमत्ता कराची आकारणी न झालेल्या मिळकतींना कर लागू करण्यासाठी महिनाभर विभागनिहाय शिबिरे आयोजित करण्याचे आदेश महापौर हिमगौरी आडके यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
राजीव गांधी भवन येथे मंगळवारी महापौर आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत कर विभागाच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनिषा खत्री प्रमुखत्वे उपस्थित होते. शहरात हजारो नवीन इमारती उभ्या राहूनही विभागीय कार्यालयांत चकरा मारल्यानंतरही त्यांना घरपट्टी लागू केली जात नसल्याच्या तक्रारी असल्याचे उपमहापौर शिंदे यांनी निदर्शनास आणले. नव्या मिळकती करकक्षेत न आल्याने महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांनी इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर त्याची माहिती तातडीने करवसुली विभागाकडे पाठवली जात असून शासनाच्या बीपीएमसी प्रणालीत तशी तरतूद असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर नव्या मिळकतींवर तातडीने मालमत्ता कर आकारणी करावी आणि त्यासाठी प्रत्येक विभागात शिबिरे घ्यावीत, असे निर्देश महापौरांनी दिले. दरम्यान, विभागीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती नव्या मिळकतींवर कर आकारणी केली याची माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मालमत्ता कर लागू करण्यासाठी विभागीय अधिकारी पैसे मागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आयुक्त खत्री यांनी या वेळी दिली. नगररचना विभागाने पाठवलेल्या नव्या मिळकतींपैकी किती मिळकतींना प्रत्यक्षात कर लागू करण्यात आला, अशी विचारणा महापौरांनी उपायुक्त (कर) नितीन पवार यांच्याकडे केली असता त्यांना माहिती सादर करता आली नाही. त्यामुळे पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्त खत्री यांनी प्रशासनाला दिले.