फोटो : B04945
नाशिक : गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करताना महापौर हिमगौरी आडके, आयुक्त मनीषा खत्री, आमदार देवयानी फरांदे, पोलिस व महापालिका अधिकारी.
गणेश विसर्जन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी
स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, वाहतूक व सुरक्षेचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांना सुरक्षित आणि सुरळीत वातावरण मिळावे, यासाठी विसर्जन मार्गाची बुधवारी (ता. १६) प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. मालेगाव स्टॅन्ड, सिद्धेश्वर महादेव मंदिर, घारपुरे घाट ते अशोकस्तंभ या मार्गाची पाहणी करून विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
विसर्जन घाटांवरील स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, आवश्यक सोयी-सुविधा, वाहतूक नियोजन तसेच सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यात आली. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव हा नाशिकच्या जनजीवनाशी आणि परंपरेशी जोडलेला उत्सव असल्याने विसर्जन मिरवणूक भक्तिमय व सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेमध्ये समन्वय साधला जात आहे. या वेळी महापौर हिमगौरी आडके, मनपा आयुक्त मनीषा खत्री, आमदार प्रा. देवयानी फरांदे, डीसीपी मोनिका राऊत, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की, राकेश चौधरी, ट्रॅफिक युनिट दोनचे अशोक शरमाळे, नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, शहर अभियंता संजय अग्रवाल तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते. गणेशभक्तांच्या श्रद्धा आणि उत्साहाला कोणतीही बाधा येऊ नये, तसेच विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पडावी, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.