टुडे साठी
-------
सिडकोच्या मलनिस्सारणासाठी ४३१ कोटींचा आराखडा
गोदावरी प्रदूषण रोखण्यावर भर; प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेवर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी सिडको व परिसरातील मलनिस्सारण व्यवस्था नव्याने उभारण्याची तयारी सुरू केली आहे. जुन्या व वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या ठरत असलेल्या मलवाहिन्यांच्या जागी नवीन जाळे उभारण्यासाठी ४३१ कोटी २९ लाख रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे.
नाशिक शहरात सिडकोकडून घरे तयार करण्यात आली. त्या वेळी तळमजल्यावरील घरांचा विचार करून मलनिस्सारण व्यवस्था तयार करण्यात आली होती. मात्र सद्यःस्थितीत सिडकोत लोकसंख्या वाढली व घरांची संख्यादेखील वाढली. एका माजल्याचे तीन मजले असे घरांचे रूपांतर झाले आहे. परिणामी जुन्या मलनिस्सारण वाहिन्यांवर ताण निर्माण झाला आहे. सिडकोची सध्याची लोकसंख्या ५.५४ लाखांच्या आसपास आहे. २०५५ पर्यंत विचार केल्यास हीच लोकसंख्या १२.८० लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सांडपाणीदेखील मोठ्या प्रमाणात वाढेल. भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रकल्पाची क्षमता निश्चित करण्यात आली आहे. योजनेत २०० ते १००० मिलिमीटर व्यासाच्या एकूण २६६.४ किलोमीटर लांबीच्या नवीन मलवाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे. अस्तित्वातील जुन्या वाहिन्या बदलल्या जाणार आहेत. योजनेत प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७, २८ आणि २९ मधील संबंधित भागांसह वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक, सद्गुरूनगर आणि गोविंदनगर या परिसरांचा समावेश करण्यात आला आहे.
--चौकट
पुढील महासभेत प्रस्तावावर चर्चा
या भागातून संकलित होणारे सांडपाणी उंटवाडी आणि आगर टाकळी येथील पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून आगर टाकळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविले जाणार आहे. गोदावरीत जाणारे सांडपाणी पूर्णपणे अडवून ते प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविणे, म्हणजेच ‘इंटरसेप्शन ॲन्ड डायव्हर्जन’ पद्धतीने नदी प्रदूषणाला आळा घालणे, हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या महासभेत हा प्रस्ताव जादा विषय म्हणून सादर करण्यात आला. सभेच्या पटलावरील सर्व धोरणात्मक निर्णयांचे प्रस्ताव तहकूब केल्याने या प्रकल्पावर तत्काळ निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे पुढील महासभेत प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
-------------------