मनपा शाळेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे
चार ठिकाणी हायटेक लॅब उभारणार; ५ हजार २२४ विद्यार्थ्यांना सुविधेचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आता शालेय स्तरापासूनच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळणार आहेत. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण’ अभियानातून शहरातील चार विभागांतील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये ‘न्यू एज टेक्नॉलॉजी स्किल लॅब’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १ कोटी ४५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, कौशल्य भारत अभियान आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षणपद्धतीत तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि बदलत्या रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्यासाठी या प्रयोगशाळांमध्ये प्रत्यक्ष कृती व प्रयोगांवर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पंचवटी, सातपूर, नाशिक रोड आणि नवीन नाशिक विभागातील प्रत्येकी एका शाळेची निवड करण्यात आली आहे. या चार शाळांमधील एकूण ५ हजार २२४ विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. पंचवटी विभागातील म्हसरूळ येथील मनपा शाळा क्रमांक १ मध्ये ६४१ विद्यार्थी आहेत. सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक २८ व मनपा हायस्कूलमध्ये एकत्रित १ हजार ४४ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. नाशिक रोड विभागातील पंचक येथील मनपा शाळा क्रमांक ४९ मध्ये ९०१ विद्यार्थी असून, नवीन नाशिक विभागातील पाथर्डी गाव परिसरातील मनपा शाळा क्रमांक ८६ व ८७ मध्ये १ हजार ६३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
--चौकट
अशी असणार लॅब
या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबतच इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन तंत्रज्ञान आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगची प्राथमिक माहिती दिली जाणार आहे. डिझाईन स्किल्स, एआर-व्हीआर आधारित शिक्षण आणि थ्रीडी प्रिंटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही अभ्यासक्रमाशी जोडून वापर केला जाणार आहे. यासाठी इंटरॲक्टिव्ह डिजिटल बोर्ड आणि डिजिटल कटेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतानाच शिक्षकांनाही या आधुनिक साधनांचा वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने तांत्रिक मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर २०२६-२७ मधील शासन अनुदानातून १ कोटी ४५ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. लॅब उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.
--------------