वाढत्या हद्दीसाठी
सहा नवीन जलकुंभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : महापालिकेने पाणीपुरवठा यंत्रणा बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत शहरातील विविध भागांत सहा नवीन उच्चस्तरीय जलकुंभ, जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यासाठी २८ कोटी १४ लाख ९८ हजार ७०७ रुपयांच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.
प्रस्तावित प्रत्येक जलकुंभाची क्षमता २० लाख लिटर असून २० मीटर उंचीवर त्यांची उभारणी केली जाणार आहे. वाढत्या उपनगरांतील पाण्याची गरज भागविण्यासोबत भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणेची क्षमता वाढविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेतील विल्होळी येथील २७४ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासह शहरातील विविध भागांत पाणीपुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. प्रस्तावित कामांमुळे बाह्य भागात वाढणाऱ्या नागरी वस्त्यांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यास मदत होणार आहे.
----------चौकट------
येथे होणार जलकुंभ
सातपूर : पिंपळगाव बहुला शिवार
नवीन नाशिक : पाथर्डी शिवार
पंचवटी : हिरावाडी, शक्तीनगर
पूर्व : नाशिक शिवार :
नाशिक रोड : देवळाली शिवार, दुर्गा उद्यान
पश्चिम : महात्मानगर
सातपूर : सुला चौक ते आशीर्वादनगर