आदर्श शिक्षकांच्या सन्मानालाच प्रमुखांची दांडी!
महापौर-आयुक्तांसह प्रमुख लोकप्रतिनिधी गैरहजर; उपमहापौरांनी व्यक्त केली खंत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्यात शिक्षकांचा सन्मान झाला; मात्र या सोहळ्याला महापौर, आयुक्तांसह निमंत्रित प्रमुख लोकप्रतिनिधींची उपस्थिती नसल्याने त्यांच्या गैरहजेरीचीच चर्चा अधिक रंगली. महापालिकेचा अधिकृत कार्यक्रम असूनही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने कार्यक्रमाच्या औपचारिकतेवरच प्रश्न उपस्थित झाले. प्रमुख पाहुण्यांच्या अनुपस्थितीची खंत उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यासपीठावरून व्यक्त केली.
शुक्रवारी (ता. १८) सदाशिव भोरे सभागृहात झालेल्या या सोहळ्याला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र पालकमंत्री गिरीश महाजन, माजी पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आडके, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार किशोर दराडे, गोकुळ गिते, सीमा हिरे, सत्यजित तांबे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सरोज आहिरे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप तसेच महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली.
व्यासपीठावरूनच नाराजीचा सूर
महापालिकेचा अधिकृत कार्यक्रम असतानाही महापौर आणि आयुक्त गैरहजर राहिल्याने उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू झाली. प्रमुख मान्यवरांच्या अनुपस्थितीची खंत उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यासपीठावरूनच व्यक्त केली. शिक्षकांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमातच महापालिकेच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती का, असा प्रश्न उपस्थित शिक्षकांमधून विचारला जात होता.
महायुतीतील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर?
निमंत्रण देऊनही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एकही नेता सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी मात्र कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे हा महापालिकेचा अधिकृत कार्यक्रम असला, तरी प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे त्याला राजकीय रंग चढल्याचे चित्र निर्माण झाले.
शिक्षकांचा गौरव हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा विषय असताना प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद, श्रेयवाद किंवा अन्य राजकीय कारणांमुळे ही अनुपस्थिती होती का, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. शिक्षकांच्या सन्मानापेक्षा राजकीय मतभेद मोठे ठरले का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित झाला.