न्यायालयीन लढ्यासाठी मनपा सज्ज
नवे वकील पॅनल नियुक्त होणार; लवकरच निवड प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : न्यायालयांमध्ये महापालिकेची बाजू अधिक प्रभावी आणि भक्कमपणे मांडता यावी यासाठी प्रशासनाकडून नवे वकील पॅनल नियुक्त केले जाणार आहे. या संदर्भातील जादा विषयाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली असून आता विहित अटी व शर्तींनुसार जाहिरात प्रसिद्ध करून निवड प्रक्रिया राबवली जाईल.
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय, कामगार व औद्योगिक न्यायालय, ग्राहक मंच, लवाद तसेच राष्ट्रीय हरित लवादासमोरील दाव्यांमध्ये महापालिकेचे प्रतिनिधित्व करणे आणि कायदेशीर बाबींवर अभिप्राय घेणे, यासाठी हे पॅनल कार्य करणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या पॅनलची मूळ मुदत संपली असली तरी न्यायालयीन कामकाजात खंड पडू नये म्हणून आयुक्तांच्या आदेशाने नवे पॅनल अस्तित्वात येईपर्यंत जुन्याच पॅनलला मुदतवाढ देण्यात आली आहे. पॅनलवरील वकिलांना सुनावणी आणि महापालिकेच्या मंजूर फी तक्त्यानुसार एकरकमी मानधन दिले जाईल, ज्यामध्ये टायपिंग, लिपिकीय मदत आणि निकालाच्या प्रतींचा खर्च समाविष्ट असेल. तारखांना हजर राहणे, दाव्यांचा मसुदा व कैफियत वेळेत सादर करणे, प्रतिज्ञापत्र तयार करणे आणि निकाल विरोधात गेल्यास अभ्यास करून अपील दाखल करणे, ही जबाबदारी वकिलांवर राहणार आहे.
-----------
मानधन तत्वावर विधी अधिकारी पद
दरम्यान, विधी विभागातील कायदा तथा विधी अधिकारी हे एकमेव मंजूर पद सध्या रिक्त असल्याने ते सहा महिन्यांच्या करारावर पूर्णपणे मानधन तत्त्वावर भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शासन स्तरावरून नियमित भरतीला मान्यता नसल्याने आणि आस्थापनेवर सक्षम अधिकारी उपलब्ध नसल्याने हा पर्याय निवडण्यात आला आहे. या पदासाठी दरमहा साठ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले असून सहा महिन्यांसाठी एकूण तीन लाख साठ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी मागण्यात आली आहे. नव्या विधी अधिकाऱ्याकडे वकील पॅनलवर नियंत्रण ठेवणे, वकिलांना दाव्यांचे वाटप करणे, संबंधित विभागांशी समन्वय साधणे तसेच महासभा आणि विधी समितीच्या बैठकांना उपस्थित राहून न्यायालयीन कामकाजावर देखरेख ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.