मला माहितीची अतिरिक्त कामे

मला माहितीची अतिरिक्त कामे
Published on
अतिरिक्त कामे मूळ ठेकेदारालाच देण्याचा प्रस्ताव सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण; महासभेच्या निर्णयाकडे लक्ष सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : अमृत २.० योजनेअंतर्गत पंचवटी, नवीन नाशिक आणि नाशिक पूर्व विभागात सुरू असलेल्या मलवाहिका टाकण्याच्या कामातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी सुमारे दोन कोटी ५८ लाख रुपयांची अतिरिक्त कामे नव्याने निविदा न काढता मूळ ठेकेदारालाच देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कामाची निकड असल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे. पंचवटी, नवीन नाशिक आणि नाशिक पूर्व भागात मलवाहिका टाकण्याचे मूळ काम ठाणे येथील ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. मात्र मूळ प्रकल्प आराखडा आणि प्राकलन तयार करताना मुख्य मलवाहिकेची पाईपलाईन, पाईप फाऊंडेशन, आरसीसी पाईप इनकेसिंग, एमएस स्टील आणि शोरिंग यासारख्या तांत्रिक बाबींचा समावेश राहिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. वाघाडी नदी परिसरात पाईप इनकेसिंग व आरसीसी चेंबर तसेच गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आरसीसी पाईल फाउंडेशन आणि शोरिंगची कामे करणे आवश्यक असून ती न झाल्यास नदी प्रदूषण रोखण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवीन निविदा प्रक्रिया राबवल्यास विलंब होईल आणि सिंहस्थासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार प्राकलन दराने जीएसटीसह दोन कोटी सत्तावन्न लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपयांची ही अतिरिक्त कामे थेट मूळ मक्तेदारालाच देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आयुक्तांच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात मलवाहिका टाकणे या लेखाशीर्षाखाली यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद असून उर्वरित सत्तावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची रक्कम पुरवणी अंदाजपत्रकातून उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावावर महासभेत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com