सिंहस्थासाठी १,२८२ एकर खासगी जमीन तात्पुरती ताब्यात घेणार
साधुग्रामसह संलग्न सुविधांसाठी प्रशासनाची लगबग; संयुक्त मोजणी, जिओ-टॅगिंग व व्हिडिओग्राफी बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२२ : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम आणि संलग्न सुविधांसाठी खासगी जमीन तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला प्रशासनाने वेग दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने महापालिका आयुक्तांसह संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना जमीन ताब्यात घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
कुंभमेळ्यासाठी एकूण १ हजार २८२ एकर ७ आर खासगी जमीन तात्पुरत्या ताब्यात अथवा भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन आहे. यापैकी नांदूर-दसक, आगरटाकळी व परिसरातील १२५ गटांमधील सुमारे १ हजार १९० एकर ११ आर जमीन संलग्न सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. तर साधुग्रामसाठी ट्रस्ट व मठांच्या मालकीच्या १४ गटांतील सुमारे ९१.९६ एकर जमीन प्रस्तावित आहे.
जमीन ताब्यात घेण्यापूर्वी संबंधित मालकी हक्क, क्षेत्रफळ आणि विद्यमान बांधकामांची अचूक पडताळणी केली जाणार आहे. भूधारकांच्या उपस्थितीत संयुक्त मोजणी करून झाडे, पिके, विहिरी, जलवाहिन्या, घरे, गोठे आणि शेततळी यांची नोंद घेतली जाईल. मोजणीपासून जमीन ताब्यात घेणे आणि कुंभमेळ्यानंतर ती परत करण्यापर्यंतच्या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय जागेचे अक्षांश-रेखांश नोंदवून जिओ-टॅग छायाचित्रे पंचनाम्यासोबत जोडली जाणार आहेत. मोजणीवेळी भोगवटादारांसह स्थानिक पंच, कृषी, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या प्रतिनिधींची उपस्थिती व स्वाक्षरी आवश्यक राहणार आहे. साधुग्रामच्या मोजणीवेळी महापालिकेसह जीवन प्राधिकरणाच्या प्रतिनिधींचीही उपस्थिती राहणार आहे.
विहित मुदतीत अंतिम निवाडा जाहीर करून निश्चित भाडेपट्टा अथवा नुकसानभरपाई वेळेत अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन आदेशानुसार वाढीव मोबदला आणि अन्य खर्चासाठी आवश्यक निधीची तरतूद महापालिकेला करावी लागणार आहे. ही संपूर्ण कार्यवाही महापालिकेच्या विकास योजना आराखडा २०१७ मधील तरतुदींनुसार आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या प्रस्तावानुसार केली जाणार आहे.