‘पीएनजी’ जोडण्यांसाठी समन्वय अधिकारी
कृती आराखडा; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियमित बैठका
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : शहरात घरगुती गॅस पाईपलाईनसाठी सुरू असलेल्या खोदकामाच्या पार्श्वभूमीवर आता प्रलंबित पीएनजी जोडण्या कार्यान्वित करण्याच्या मुद्द्यालाही प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पीएनजीची पायाभूत सुविधा उभारण्यात आली असली तरी स्थानिक परवानग्या, तांत्रिक अडचणी आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाअभावी अनेक ग्राहकांच्या जोडण्या प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रलंबित जोडण्यांचा स्वतंत्र आढावा घेऊन कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्राच्या आवासन व शहरी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार राज्यात पीएनजी सुविधांच्या वापराला चालना देण्यासाठी ही कार्यवाही करण्यात येत आहे.
परिपत्रकानुसार महापालिका पातळीवर उपायुक्त (मुख्यालय) यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात येणार असून नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर संबंधित मुख्याधिकारी ही भूमिका पार पाडणार आहेत. राज्य पातळीवर नगरपरिषद प्रशासन संचालनालयातील मुख्य अभियंत्यांवर समन्वयाची जबाबदारी राहणार आहे. प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियमित बैठका घेण्यात येणार असून त्यात सिटी गॅस वितरण कंपन्या, तेल विपणन कंपन्या आणि गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. या बैठकीत प्रलंबित जोडण्यांची संख्या, आवश्यक परवानग्या, तांत्रिक अडचणी आणि आंतरविभागीय समन्वय यांचा आढावा घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये पाइपलाइन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदले जात असताना उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रत्यक्ष लाभ घरांपर्यंत पोहोचण्यावर आता भर दिला जाणार आहे. प्रक्रियेतील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून पात्र ग्राहकांना गॅसपुरवठा सुरू करण्याबरोबरच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पीएनजी वापराबाबत जनजागृती करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.