फासपोर्ट फोटो वापरा
---
शहर खड्डेमुक्त होण्यासाठी अमित ठाकरेंचे साकडे
गणेश मंडळांना भेटी; दुष्काळमुक्तीच्या घोषणेवरून सरकारवर टीका
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेटी देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे मंगळवारी (ता. २२) नाशिक दौऱ्यावर आले होते. या भेटीदरम्यान त्यांनी मंडळांमध्ये जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा, शहर खड्डेमुक्त व्हावे तसेच राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, यासाठी साकडे घातले.
मंडळ भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर निशाणा साधला. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची घोषणा गेल्या बारा वर्षांत तेरा वेळा करण्यात आल्याचा दावा करत नेमकी कोणती पिढी दुष्काळमुक्त होणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. दुष्काळ नैसर्गिक असताना अभ्यासाच्या नावाखाली विलंब न लावता तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. राजकीय घडामोडींवरील खर्चाऐवजी शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यावे, असे सांगत दर ४८ मिनिटांनी एक शेतकरी आत्महत्या होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मंत्र्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा, असे मत त्यांनी मांडले. गणेशोत्सवानंतर पुणे, मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर नाराजी व्यक्त करताना मोठा निधी खर्च होऊनही कामांचा दर्जा समाधानकारक नसल्याचा आरोप त्यांनी केला. या नियोजनातील कथित भ्रष्टाचार आगामी काळात उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.