पान एक ॲंकर
-------------------
19171
फोटो ओळ : विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व विविध विभागांचे अधिकारी.
अपूर्ण विकास कामे १४ दिवसात पूर्ण करा
मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांच्या विभागांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नंदूरबार, ता. १४ : जिल्ह्यात अपूर्ण अवस्थेत असलेली कामे पुढील दोन आठवड्यात पूर्ण करावीत. तसेच कामात गती आणि गुणवत्ता राखावी, असे सक्त निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिले. श्री. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय सभा पार पडली. या सभेत जिल्ह्यातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सभेत महिला व बालविकास विभागांतर्गत २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील अंगणवाडी बांधकामांच्या सद्यःस्थितीचा अंगणवाडीनिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये जागेअभावी किंवा अन्य कारणांमुळे रखडलेली बांधकामे, अपूर्ण अवस्थेतील बांधकामे पुढील दोन आठवड्यांच्या आत पूर्ण करून संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरित करणे, पूर्ण झालेल्या अंगणवाडी इमारती हस्तांतरण करून कामपुर्णत्वाचा दाखला व हस्तांतरण प्रमाणपत्र सादर करणे याबाबत चर्चा झाली.
१५ वा वित्त आयोग प्राप्त अनुदान व झालेला खर्च आणि मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियान कामकाजाचा आढावा घेण्यात आला. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना पारदर्शक सेवा देणे व देयक अदायगी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले.
सभेत घेतलेल्या निर्णयांचे आणि दिलेल्या सूचनांचे ''मुद्देनिहाय अनुपालन'' पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश सर्व खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत. गतिमान प्रशासन आणि गुणवत्तापूर्ण विकासकामांसाठी सर्व क्षेत्रीय यंत्रणेने झोकून देऊन काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले.
--------
घरकुल योजनेवर विशेष लक्ष
प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल, रमाई घरकुल आणि मोदी आवास योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या समन्वयातून घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत गाठण्यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. नियोजनबद्ध कामाद्वारे विहित कालावधीत लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना नमन गोयल यांनी यावेळी दिल्या.