दोन कॉलमात घ्यावी
‘नूतन मराठा’तील प्राध्यापिकेच्या
संशोधनाला केंद्र सरकारचे पेटंट
उपशीर्षक
रोपांच्या संवर्धनाचे प्रमाण वाढविणारे उत्पादन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : नूतन मराठा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. वर्षा अशोक भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या पोर्टेबल प्लँटलेट अॅक्लिमटायझेशन चेंबर या अभिनव डिझाइनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने अधिकृत मंजुरी प्रदान केली आहे. डिझाइन अधिनियम २००० अंतर्गत या पेटंटची नोंदणी करण्यात आली आहे.
वनस्पती ऊतकसंवर्धन (Plant Tissue Culture) प्रक्रियेत प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात तयार झालेली नाजूक रोपे जेव्हा थेट नैसर्गिक वातावरणात लावली जातात, तेव्हा तापमान आणि आर्द्रतेतील बदलामुळे ती मोठ्या प्रमाणात मरतात. ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. वर्षा भालेराव यांनी या विशेष चेंबरची निर्मिती केली आहे. हे चेंबर प्रयोगशाळेतून बाहेर काढताना रोपांवर येणारा ताण कमी करते, ज्यामुळे रोपांचा सर्व्हायव्हल रेट लक्षणीयरीत्या वाढतो. हे उपकरण कृषी संशोधन संस्था, व्यावसायिक नर्सरी आणि शैक्षणिक प्रयोगशाळांसाठी क्रांतीकारक ठरणार असून, यामुळे शाश्वत शेतीला बळ मिळणार आहे.
या महत्त्वाच्या संशोधनात डॉ. वर्षा भालेराव यांच्यासोबत धाराशिव येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्रीकांत भोसले, प्रा. अर्चना मुखेडकर आणि डॉ. शीला शिंदे यांचाही सहभाग आहे. या पेटंटमुळे आता संशोधकांना या डिझाइनवर कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण पी. देशमुख यांनी संशोधकांचे विशेष कौतुक केले.
------