NSK26H19208
जिल्हा परिषदेत अखेर बदल्यांची प्रक्रिया पूर्ण
समुपदेशनाने ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; विविध संवर्गाचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागात कार्यरत असलेल्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया नुकताच पार पडली. समुपदेशनाद्वारे पार पडलेल्या या प्रक्रियेत ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांतील एकूण ३९ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, ५५ कर्मचाऱ्यांच्या विनंती तसेच ३ कर्मचाऱ्यांच्या आपसात बदल्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती तसेच आपसी बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील ७ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर २ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातील १ प्रशासकीय व १ विनंती बदली करण्यात आली. कनिष्ठ लेखाधिकारी संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली, वरिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ प्रशासकीय तर कनिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ विनंती बदली करण्यात आली.
परिचर संवर्गातील १० कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या केल्या. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संवर्गातील एका कर्मचाऱ्याची तसेच वाहन चालक संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली. आरोग्यसेवक संवर्गातील ४ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, १४ कर्मचाऱ्यांच्या विनंती तर २ कर्मचाऱ्यांच्या आपसात बदली, आरोग्यसेविका संवर्गातील २१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, ११ कर्मचाऱ्यांच्या विनंती तर १ कर्मचाऱ्याची आपसात बदली, आरोग्य सहाय्यक संवर्गातील ६ पुरुष कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या, आरोग्य सहाय्यक महिला संवर्गातील २ प्रशासकीय व ३ विनंती बदल्या करण्यात आल्या.
चौकट
आरोग्य पर्यवेक्षकांच्याही बदल्या
आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली, औषध निर्माण अधिकारी संवर्गातील २ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर ३ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या व प्रयोगशाळा संवर्गातील १ कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली करण्यात आली.
–