बोधचिन्हात वैष्णवप्रतिके नसल्याने प्रचंड नाराजी

बोधचिन्हात वैष्णवप्रतिके नसल्याने प्रचंड नाराजी
Published on
फोटो : १९१९९ बोधचिन्हात वैष्णवप्रतीके नसल्याने प्रचंड नाराजी --- सिंहस्थ बोधचिन्ह बदलण्याची वैष्णवांकडून मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : नुकत्याच अनावरण केलेल्या सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या बोधचिन्हात वैष्णवांची प्रतीके नसल्याचा निषेध वैष्णव आखाड्यांमध्ये जागोजागी व्यक्त होत आहे. श्रीरामाचे धनुष्यबाण, शंख, चक्र अथवा सर्वसमावेशक ओम यापैकी काही तरी बोधचिन्हात समावेशीत असायला हवे होते, असे वैष्णवांचे म्हणणे असून, कुंभमेळा एकट्या शैवांचाच आहे का? असा सवालही वैष्णव साधू उपस्थित करीत आहेत, त्यामुळे हा वाद एका वेगळ्याच दिशेला जात असल्याची चिन्हे आहेत. सिंहस्थ- कुंभमेळा जवळ येत चालला असून, या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १३) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण झाले. नाशिक- त्र्यंबकेश्वरचा पवित्र भूगोल, धार्मिक परंपरा लक्षात घेऊन बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. यात प्रादेशिक वारसा त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिराची कलाकृती, आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक भगवान शंकराचे त्रिशूळ, शिवलिंग स्वरूपात गोदावरी नदी रेखाटून पवित्र स्नानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मात्र, या सर्व प्रतीकांमध्ये वैष्णवांचे एकही प्रतीक घेण्यात आलेले नसल्याचे साधू-महंतांचे म्हणणे आहे. कुंभमेळ्याची वस्तुस्थिती काय? भारतात कुंभमेळ्याची एकूण चार ठिकाणे आहेत. हरिद्वार आणि प्रयाग ही वैष्णव, तर उज्जैन व त्र्यंबकेश्वर ही शैव ठिकाणे आहेत. कुंभमेळा शैवांचा की वैष्णवांचा यावरून १७५४ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे भरलेल्या कुंभमेळ्यात दोघांचे घनघोर युद्ध झाले. त्यात प्रचंड नरसंहार झाला. या वेळी पेशव्यांनी न्यायनिवाडा केला आणि नाशिकला वैष्णव, तर त्र्यंबकेश्वरी शैव स्नान करतील, असे निश्चित करण्यात आले. त्यामुळे बोधचिन्हात नाशिक- त्र्यंबकेश्वर असे नमूद करण्यात आले आहे; परंतु त्यात वैष्णवांची प्रतीके घेण्यात आलेली नाहीत. कोट बोधचिन्ह वैष्णव आखाड्यांना आक्षेपार्ह वाटत असेल तर त्यांनी अनावरणप्रसंगी यासंदर्भात शंका उपस्थित करणे अपेक्षित होते; परंतु आता छोट्या गोष्टींवरून वाद उत्पन्न करणे उचित नाही. बोधचिन्हात बदल करण्यास हरकत नाही; परंतु बदल करताना शैव व वैष्णव आखाड्यांमधील महंतांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही व्हायला हवी. मुळात कुंभमेळा प्राधिकरणाने बोधचिन्ह अंतिम करण्यापूर्वी आखाडा परिषदेला दाखविणे अपेक्षित होते. - महंत शंकरानंद सरस्वती, कोशाध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर --- बोधचिन्हात वैष्णवांची प्रतीके नाहीत, त्यात श्रीरामांचे धनुष्य किंवा सर्वसमावेशक ओम घेता आला असता; परंतु तसे झालेले नाही. याबाबत प्रशासनाशी बोलणे झाले. आम्ही आमचे मत मांडले आहे. येत्या दोन- तीन दिवसांत हे बोधचिन्ह बदलवणार असल्याचे सांगण्यात आले. आम्ही वाट पाहू. - महंत भक्तिचरणदास महाराज, राष्ट्रीय प्रवक्ता, वैष्णव आखाडा परिषद --- कुंभमेळ्याच्या या बोधचिन्हात खूप उणिवा आहेत. श्री काळाराम मंदिर का नाही म्हटले, तसेच मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओत काशीचे घाट दाखविले. नाशिकचा आणि काशीचा काय संबंध? कुंभमेळ्याचा काशीचा काय संबंध? कुंभ नाशिकला पंचवटीत भरतो. लोगोत शिवतत्त्वाबरोबर विष्णुतत्त्व आणि अमृततत्त्व यांचा समतोल आवश्यक वाटतो. - श्रीमहंत सुधीरदास महाराज, अखिल भारतीय पंच रामानंद निर्माण आखाडा --- कुंभमेळ्याची कथा देव-दानव, समुद्रमंथनाशी जोडलेली आहे. त्यामुळे बोधचिन्हात शिवतत्त्वाबरोबर विष्णुतत्त्व आणि अमृततत्त्व यांचा समतोल आवश्यक वाटतो. भाविकांच्या भावना, पुराणातील संदर्भ आणि धार्मिक तत्त्वज्ञान यांचा विचार करून समृद्ध बोधचिन्ह तयार होईल, अशी अपेक्षा अनेक सनातनप्रेमींना आहे. - डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख, अखिल भारतीय संत समिती
Marathi News Esakal
www.esakal.com