19224
ढेकवद : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत गावात तयार झालेले बहुमजली घरकुल.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बहुमजली घरकुल उभारणी
ढेकवद ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
नंदूरबार, ता. १४ : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘महा आवास अभियान - २०२३-२४ मध्ये नंदुरबार तालुक्यातील ढेकवद ग्रामपंचायतीने सर्वोत्कृष्ट बहुमजली घरकुल बांधकाम प्रकारात राज्यातील तृतीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार पटकावला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण भागातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सुरक्षित व सन्मानजनक निवास उपलब्ध करून देणारी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यात ढेकवद ग्रामपंचायतीने घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण बांधकाम, नियोजनबद्ध कार्यपद्धत, लाभार्थी केंद्रित दृष्टीकोन तसेच उपलब्ध मर्यादित जागेत नावीन्यपूर्ण बहुमजली घरकुल उभारणी या वैशिष्ट्यामुळे ढेकवदची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची राज्यभर दखल घेतली गेली असून, इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळणार आहे. भविष्यातही ग्रामीण विकास, घरकुल योजना व जनहिताच्या उपक्रमांमध्ये जिल्हा अधिक प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरकुलांची उभारणी करण्यात येत असून, अनेक लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.
पुरस्कारासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी जयवंत उगले, गटविकास अधिकारी अर्चना वाघमोडे, सरपंच विनुबाई ताराचंद पाडवी, ग्रामपंचायत अधिकारी अनिल वळवी, अभियंता मोईन काझी व श्री.पठाण, ग्रामरोजगार सेवक गजानन पाटील व नंदुरबार पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी, मनरेगा विभागातील अधिकारी-कर्मचारी याचे मार्गदर्शन मिळाले.
आज पुरस्कार वितरण
केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.१५) सैनिक स्कूल, सातारा येथे लाभार्थी मेळावा आणि अभियानाचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यामुळे गावाला पुरस्कार
तिज्या रेशा वसावे यांना २०२२-२३ मध्ये घरकुल मंजूर झाले होते. त्यानंतर २०२४-२५ त्यांचा मुलगा राजेश तिज्या वसावे यास घरकुल मंजूर झाले. त्याचप्रमाणे अमित कोचऱ्या वळवी यांना २०२२-२३ मध्ये घरकुल मंजुर झाले होते. त्याचवर्षी त्यांचा मुलगा कोचऱ्या शामा वळवी यास घरकुल मंजूर झाले. जागेची उपलब्धता नसल्याने या चारही लाभार्थ्यांनी आधी मंजूर घरकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर घरकुल बांधून बांधून योजनेचा लाभ घेतला. या वैशिष्ट्यामुळे शासनाने ढेकवद गावाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे.
19238
प्रधानंमत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत वडिलांनंतर मुलाला घरकुल मंजूर झाले होते. जागा उपलब्ध नसल्याने आधी बांधलेल्या वडीलांच्या घरावर मुलाचे घर बांधण्यात आले. यामुळे उपलब्ध जागेत दोन लाभार्थ्यांना घर उपलब्ध होऊ शकले. बहुमजली इमारत बांधकामाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
अनिल वळवी, ग्रामपंचायत अधिकारी