सेकंड मेन
---
फोटो : NSK26H19216
कुंभरी : वन व्यवस्थापन समिती सदस्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी.
------------------------
वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक
जिल्हाधिकारी सेठी यांनीक्षेत्र भेटीद्वारे ग्रामस्थांशी साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १५ : हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जल, जंगल आणि जमीन संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. मिलेट इंडस्ट्रियल क्लस्टरच्या धर्तीवर वन क्षेत्रावर आधारित उद्योग उभारणीसाठी मोठी संधी उपलब्ध असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी येथे केले.
तालुक्यातील कुंभरी येथे आयोजित वन व्यवस्थापन समिती सदस्यांच्या संवाद बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी कुंभरी, निगदी, तेलखेडी यांसह परिसरातील १० ते १२ गावांतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या पावसाळ्यात सीएफआर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने वृक्षलागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. शेती-वन-फलोत्पादन या त्रिसूत्रीवर आधारित लागवड केल्यास पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक स्थैर्यही मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. वन क्षेत्रावर आधारित उद्योगांसाठी अभ्यास सहली आणि तांत्रिक मार्गदर्शनाची सोय करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
वन व्यवस्थापन समिती सदस्यांनी यावेळी पाणी स्त्रोत नियोजन, रोपवाटिका आणि संरक्षणासाठी जैविक कुंपण मिळण्याची मागणी केली. या सुविधा मिळाल्यास सामूहिक वृक्षलागवडीला अधिक गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
--
प्रत्यक्ष पाहणी आणि कौतुक
जिल्हाधिकाऱ्यांनी कुंभरी येथील सामूहिक वनहक्क क्षेत्रातील बांबू व मिश्र वृक्षलागवडीची बारकाईने पाहणी केली. विशेषतः वैयक्तिक वनहक्कधारक सेगा राज्या पटले यांनी आपल्या वनक्षेत्रात फुलवलेल्या आंबा, काजू, महू आणि बांबूच्या बागेचे त्यांनी कौतुक केले. तसेच, ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने तेंदूपत्ता संकलित करून त्याची पूड तयार करण्याची प्रक्रियाही जिल्हाधिकाऱ्यांना समजावून सांगितली.
--