जिल्ह्यात एक लाख १६ हजार जात प्रमाणपत्रांचे वाटप
माजी न्यायाधीश शिंदे यांच्याकडून कामकाजाबद्दल समाधान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या एक कोटी दहा लाखांहून अधिकच्या नोंदी तपासण्यात आल्या आहेत. या तपासणीवेळी प्राप्त अर्जांची छाननी करताना एक लाख १६ हजार ५५८ नवीन जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशासनाच्या या कार्याबद्दल सरकारने गठित केलेल्या समितीचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
राज्य सरकारने कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती ठरवून दिली आहे. त्याअनुषंगाने निवृत्त न्यायाधीश शिंदे यांनी गुरुवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे (दिंडोरी) व कैलास कडलग (चांदवड), जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव राकेश पाटील आदी उपस्थित होते. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह इतर अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.
निवृत्त न्यायाधीश शिंदे म्हणाले, पात्र लाभार्थ्यांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा. तसेच जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेची गती वाढवावी. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून घ्यावी, अशा सूचना केल्या. प्राप्त अर्जांची सद्यःस्थिती व निकाली काढलेले अर्ज, प्रलंबित अर्जांची कारणे व त्यावरील उपाय योजना, प्रमाणित मोडी लिपीचे भाषांतरकार आदींबाबही शिंदे यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.
तीस हजारांहून अधिक जातवैधता प्रमाणपत्र
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी, नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील एक कोटी दहा लाखांहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत एक लाख १८ हजार ५८५ अर्जांपैकी एक लाख १६ हजार ५५८ नवीन जात प्रमाणपत्रे वितरीत केले. तसेच ६ मेपर्यंत ३० हजार ७९९ जातवैधता प्रमाणपत्रे प्रदान केल्याची माहिती दिली.
---
फोटो क्रमांक : एच-19217