जिल्हा टुडे पान चारसाठी ॲंकर
---
NSK26H19204
जळगाव : वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत वाढत्या अपघातांवर चर्चा करताना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे.
---
वाढत्या अपघातांवर पोलिस विभागाचा कृती आराखडा
ट्रक-ट्रॅक्टर चालकांना मिळणार वाहतूक प्रशिक्षण; हॉटेल चालकांना ''सीपीआर''चे धडे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख रस्ते, राज्य महामार्गावर होणाऱ्या प्रांणातिक अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस दलाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाहतूक शाखेतील कर्मचारी, अधिकारी आणि संपूर्ण जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी, अंमलदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची बैठक घेतली.
जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यातील रस्ते, भौगोलिक परिस्थिती आणि त्या अनुषंगाने वार्षिक अपघातांची संख्या आदींची ठोस माहिती सोबत घेऊन आयोजित बैठकीत अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, कविता नेरकर, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच हायवे स्टेट पॅट्रोलचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील वाढत्या अपघातांची कारणे, मृत्यूंचे प्रमाण आणि त्यावरील उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.
मदतीचे ‘बॅकअप’
बैठकीत एमआयडीसी परिसरातील ट्रकचालकांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात येणार असून, गावागावांमधील ट्रॅक्टर चालकांनाही वाहतूक नियमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महामार्गालगतच्या ढाबे व हॉटेल चालकांना अपघातानंतर तातडीने मदत कशी करावी, ‘सीपीआर’सारखे प्राथमिक उपचार कसे द्यावेत, याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौकट
अपघातस्थळांबाबत पाठपुरावा
राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणांबाबत ‘न्हाई’ आणि ससार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लग्नसराईत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई, महामार्गावर साइडला उभ्या ट्रकवर दंडात्मक कारवाई तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
चौकट
अपघातग्रस्तांना मदतीची यंत्रणा
अपघातग्रस्तांना बहुतांश वेळा खासगी वाहनांतून हलविले जात असल्याचे निदर्शनास आल्याने वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यावरही भर देण्यात आला. प्रत्येक पोलिस वाहनात ‘फर्स्ट एड बॉक्स’ ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, जनजागृती मोहिमेलाही गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.