फोटो : B60259
सिग्नलवरील लाल दिवा आता सुसह्य
उन्हाच्या तडाख्यावर त्रिमूर्ती चौकात ‘मंडप’चा उतारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : शहरात कधी नव्हे ते कमाल तापमानाने ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेले असताना, या वाढत्या तापमानामुळे नाशिककर कमालीचे हैराण झाले आहेत. सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक सिग्नलवर उभारण्यात आलेल्या मंडपामुळे वाहनचालकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. भरदुपारी सिग्नलवर थांबावे लागणाऱ्या दुचाकीस्वारांसह रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना या मंडपामुळे रखरखत्या उन्हापासून संरक्षण मिळत आहे.
काही दिवसांपासून नाशिक शहरात उन्हाचा चटका वाढला असून दुपारच्या वेळेत नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. कमाल तापमानही ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विशेषतः सिग्नलवर काही मिनिटे थांबावे लागणाऱ्या दुचाकीस्वारांना प्रखर उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन त्रिमूर्ती चौक सिग्नल परिसरात मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपामुळे वाहनचालकांना थेट उन्हापासून काही प्रमाणात बचाव मिळत असून पादचाऱ्यांनाही उभे राहण्यासाठी सावलीची सोय झाली आहे. दुपारच्या वेळेत या मंडपाचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत शहरातील इतर प्रमुख चौकांमध्येही अशाच प्रकारची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. वाहतूक कोंडी आणि उन्हाच्या तडाख्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी हा छोटासा उपक्रम दिलासादायक ठरत असून सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले जात आहे.