टुडे पान एकसाठी
------------------
आरटीई प्रवेश प्रक्रियेला वेग
२५ टक्के राखीव जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : शिक्षणहक्क अधिनियम (आरटीई)अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आता प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषदेतील समग्रशिक्षा जिल्हा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने याबाबतचे आदेश गुरुवारी (ता.१४) जारी करण्यात आले.
या (२०२६-२७) शैक्षणिक वर्षासाठी ‘आरटीई’अंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत बुधवारी (ता.१४) प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. पालकांना ‘एसएमएस’द्वारे माहितीही पाठविण्यात येत आहे.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केवळ ‘एसएमएस’वर अवलंबून न राहता ‘आरटीई’ या पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेत जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी समितीकडून करण्यात येणार आहे. प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.