दुहेरी खून प्रकरणातील संशयित राहुल जगतापला जामीन
---
कापडणीस पिता-पुत्र खून खटला : मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांच्या मुलाच्या खून प्रकरणी वर्ष २०२२ पासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेला मुख्य संशयित राहुल जगताप यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणातील तिघांना यापूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
जुन्या पंडित कॉलनीत राहणाऱ्या कापडणीस पिता-पुत्राचा डिसेंबर २०२१ मध्ये पूर्वनियोजित कट रचून खून करण्यात आला होता. खून केल्यावर दोघांचे मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मोखाडा (जि. पालघर) परिसरातील निर्जनस्थळी टाकण्यात आले होते. सदरील गुन्हा उघडकीस आल्यावर पोलिसांनी मुख्य सूत्रधार संशयित राहुल गौतम जगताप, प्रदीप जगन्नाथ शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोरे यांना २०२२ मध्ये अटक केली होती. या खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात सरकारवाडा पोलिसांनी एक हजार ६०० पानी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले असून, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे या खटल्यात सरकार पक्षातर्फे कामकाज पाहत आहेत. या गुन्ह्यातील संशयित मोरे याला सन २०२४, तर शिरसाठ व हेमके यांना २०२५ मध्ये सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. खुनातील इतर संशयितांना जामीन मिळाल्याने राहुल यालाही समानतेच्या तत्त्वावर जामीन मिळणे आवश्यक असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवून घेत त्यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.