रवंजे येथील स्वच्छतागृह
हटविण्यासाठी उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
एरंडोल, ता. १४ ः रवंजे बुद्रुक (ता. एरंडोल) येथील एका घरासमोर अनधिकृत बांधलेले स्वच्छतागृह हटविण्यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने न्यायासाठी लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.
रवंजे बुद्रुक येथील सुनीता चव्हाण यांच्या घरासमोर अनधिकृत बांधलेले स्वच्छतागृह, उकीरडे व अस्वच्छतेमुळे त्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृहामुळे घरासमोर सतत दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत असून, कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सौ. चव्हाण यांचे म्हणणे आहे. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कुटुंबातील सदस्यांना वारंवार टायफॉईड, मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या घरासमोरच काही जण उघड्यावर लघुशंका करीत असल्याने महिलांना लज्जास्पद होते. यामुळे कुटुंबाचे दैनंदिन जीवनही त्रस्त झाले आहे. स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीची तांत्रिक मान्यता असताना, घरासमोर नव्याने स्वच्छतागृह बांधण्यात आले. या कामासाठी कोणतेही अधिकृत लाईनआऊट घेण्यात आलेले नाही. यापूर्वी पंचायत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली होती. चौकशी अहवालात अनियमिततेबाबत स्पष्ट निरीक्षणे नोंदवूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कुटुंबात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने सौ. चव्हाण व कुटुंबीयांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.