टुडे एक मेन फिचर
NSK26H19234
जळगाव : महापालिकेच्या महासभेत बोलताना महापौर दीपमाला काळे. व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसचिव सतीश शुक्ला.
-------------
NSK26H19235
मेहरुण रस्त्याच्या विषयावर संताप व्यक्त करताना शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे.
------------
NSK26H19236
व्यासपीठावरून खाली येऊन उपमहापौर मनोज चौधरी महापौरांशी बोलताना.
------------
महासभेत भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी
रस्त्याच्या विषयावरून सत्ताधाऱ्यांत मतभेद; महापौर-उपमहापौरांमध्ये शाब्दिक चकमक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद प्रथमच उघडपणे समोर आले. मेहरूण शिवारातील रस्त्याच्या आराखड्यात बदल करण्याच्या विषयावरून महासभेत दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेने भाजपवर एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करीत तटस्थ भूमिका जाहीर केली, तर भाजपने हा निर्णय सर्वानुमते झाल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे पडलेल्या वादाच्या ठिणगीमुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
महापालिकेच्या सभागृहात महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडली. व्यासपीठावर उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभागृहात विषयपत्रिकेवरील चौथा विषय चर्चेला आला. मेहरूण शिवारातील स. नं. ४५५ मधील ३०० मीटर रुंद रस्त्याच्या आराखड्यात बदल करून त्याखालील मुक्त क्षेत्र निवासी क्षेत्रात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव होता. भाजपने हा विषय तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे सदस्य दीपक सूर्यवंशी यांनी त्याला अनुमोदन दिल्यानंतर पुढील विषयावर चर्चा सुरू करण्यात आली. मात्र, याचवेळी शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे यांनी तीव्र आक्षेप घेतला. हा केवळ नऊ मीटरचा रस्ता असून महापालिकेच्या हिताचा विषय आहे. मग तो तहकूब का ठेवण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच विषयाला काेणी अनुमाेदन दिले याची माहिती द्या, असे परस्पर विषय तहकूब करू शकत नाही. असे मनमानीपणे निर्णय घेत असेल तर या विषयावर शिवसेना तटस्थ राहील, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यांच्या वक्तव्याला शिवसेनेच्या सदस्यांनी हात वर करून समर्थन दिले.
सर्वानुमते निर्णय;भाजपचे स्पष्टीकरण
यावर दीपक सूर्यवंशी यांनी विषय सर्वानुमते तहकूब करण्यात आल्याचे स्पष्ट केले. विषयावर चर्चा सुरू असताना कोणीही विरोध केला नाही. पुढील विषय सुरू झाल्यानंतर मागील विषयावर आक्षेप घेणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मध्यस्थी करत सांगितले, की हा विषय मंजूर करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र गोपाळ देवकर यांनी ऐनवेळी न्यायालयीन प्रकरणासंदर्भात पत्र दिल्याने कायदेशीर बाजू तपासण्यासाठी वेळ आवश्यक होता. त्यामुळेच विषय तहकूब करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांनीही देवकरांचे पत्र उशिरा प्राप्त झाल्याचे सांगत न्यायालयीन बाब लक्षात घेऊन विषय पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट केले.
ठाकरे गटाने साधला डाव
सभागृहात भाजप व शिवसेना यांच्या वादात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक इब्राहीम पटेल यांनी भाजपच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर करीत शिवसेना पक्षाला अप्रत्यक्षपणे शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद अधिकच स्पष्ट झाल्याची चर्चा रंगली.
चौकट
शाब्दिक चकमकीने पेटला वाद
भाजप आणि शिवसेना सदस्यांतील वाद शांत होत असतानाच महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्यातही व्यासपीठावरून शाब्दिक चकमक झाली. चौधरी यांनी एका विषयावर बोलण्यासाठी वेळ मागितला असता महापौरांनी वेळ संपल्याचे सांगत त्यांना थांबविले. त्यावर चौधरी यांनी व्यासपीठाखाली येतच आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खाली येऊन शहर स्वच्छतेसंदर्भात आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर महापौरांनी त्यांना पुन्हा व्यासपीठावर बोलावून घेतले.