धुळे ः टुडे २ साठी, मेन
--
फोटो क्रमांक ः 19230
सुरत : धुळे व्यापारी महासंघ बिझनेस फोरमच्या दौऱ्यात जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्या समवेत नितीन बंग, राजेश गिंदोडिया, अजय नाशिककर, किशोर डियालानी आदी.
--
धुळ्याच्या व्यापार- उद्योगाला ‘सुरत पॅटर्न’ची जोड
-
व्यापारी महासंघाचा दौरा : जलशक्तीमंत्र्यांसह गुजरात चेंबरकडून सहकार्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : शहराचा व्यापारी आणि उद्योजक अधिक प्रगत व संपन्न व्हावा, त्या माध्यमातून धुळे शहाराच्या विकासाला गती मिळावी, या उद्देशाने धुळे व्यापारी महासंघ बिझनेस फोरमच्या ६० सदस्यीय पथकाने ९ व १० मेस सुरत शहराचा अभ्यास दौरा केला. यात कापड उद्योग, हिरे व्यापार आणि तांत्रिक संस्थांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यात आला. या दौऱ्यात धुळे व सुरतच्या औद्योगिक प्रगतीसाठी साउथर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्सने सहकार्याचा हात पुढे केला आहे. याद्वारे सुरतसारख्या जागतिक व्यापार केंद्राचा अनुभव धुळ्यातील व्यापारी, उद्योजकांना नक्कीच नवी दिशा देणारा ठरेल.
-
दौऱ्याच्या ६० सदस्यांनी ७०० कोटींची उलाढाल असलेल्या सुचित्रा टेक्सटाईल्सकडून कापडनिर्मिती, डायिंग आणि डिजिटल प्रिंटिंगचे अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घेतले. नंतर जागतिक स्तरावर नावाजलेल्या हरिकृष्ण एक्सपोर्ट्स या हिरे उद्योगाला भेट दिली. संचालक पिंटू ढोलकिया यांनी पाच हजार कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आणि उद्योगाची सामाजिक बांधिलकी यावर मार्गदर्शन केले.
-
जलशक्तीमंत्र्यांशी चर्चा
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी धुळ्याच्या औद्योगिक विकासाची माहिती घेत महासंघाच्या उपक्रमांचे कौतुक केले. बिझनेस फोरमला दिल्ली भेटीचे आमंत्रण दिले.
-
एनआयटीकडून मदत
दौऱ्यात दहा मेस केंद्र शासन पुरस्कृत नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी संस्थेला भेट दिली. डॉ. संजय शहा, श्री. दुबे व श्री. चौधरी यांनी संस्थेच्या स्टार्टअप मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्याबद्दल माहिती दिली. यात तांत्रिक क्षेत्रात धुळे व्यापारी महासंघ आणि एनआयटी भविष्यात एकत्रित काम करण्यावर शिक्कामोर्तब झाले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे ५०० कोटींच्या अनुदानातून २०१७ ला सुरु झालेली ही संस्था नवउद्योजकांना मार्गदर्शन, आर्थिक मदत, तांत्रिक सहाय्य देते.
-
सुरत चेंबरसोबत बैठक
दौऱ्याचा समारोप सुरत येथील १४ हजार उद्योजकांचे नेतृत्व करणारी, दीडशे संस्था सदस्य असलेल्या साउथर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीने झाला. चेंबरचे नूतन अध्यक्ष अशोक जीरावाला, विद्यमान अध्यक्ष निखिल मद्रासी, सचिव ब्रिजल जरीवाला यांनी धुळे आणि सुरतच्या विकासासाठी दोन्ही संस्था एकमेकांच्या सोबतीने काम करतील, अशी ग्वाही दिली. बैठकीत धुळे, नरडाणा, नंदुरबार आणि नवापूर येथील औद्योगिक संधींवर चर्चा झाली.
-
दौऱ्यातील सहभागी सदस्य
दौऱ्यात धुळे व्यापारी महासंघ बिझनेस फोरमचे नितीन बंग, राजेश गिंदोड़िया, अजय नाशिककर, प्रशांत देवरे, ख़िमज़ी पटेल, हर्षकुमार रेलन, सुशील खंडेलवाल, अभिजीत सूर्यवंशी, इंद्रजीत शाह, हेमंत जैन, किशोर डियालानी, महेश बाफना, सुरेश बंग, सीए सागर गर्ग, सुनील पसारी, सीए निलेश अग्रवाल, महेश गाबड़ा, किशोर जैन, रवींद्र कोटकर, डॉ. अल्पेश पिंगळे, समीर बहाळकर, लीलाधर पटेल, नोद परदेशी, संदीप महाले, संतोष पंजाबी, फरहान अन्सारी आदींनी सहभाग नोंदवत धुळ्याच्या प्रगतीचा संकल्प सोडला.
-