कोटसाठी फोटो ः NSK26H19242
कोटसाठी फोटोओळ ः राकेश मुंडावरे
पाइपलाइन रोड- कॅनॉल रोडवर
‘सिग्नल’ सुरू करावेत
---
नागरिकांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : येथील गंगापूर रोडवरील डी मार्ट सर्कलजवळील पाइपलाइन रोड, सिरेन मिडोजकडे जाणारा रस्ता आणि कॅनॉल रोड या मुख्य चौकात दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथे तत्काळ वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या चौकात दररोज नियमितपणे एक ते दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महापालिकेने या समस्येची दखल घेऊन येथे त्वरित ‘सिग्नल’ कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
---
सध्याचे सर्कल अपयशी
सध्याचे वाहतूक सर्कल चहूबाजूंनी येणारी वाहने, तसेच ‘एमआयडीसी’मधून येणारी अवजड वाहने यांचा प्रचंड भार सांभाळण्यास सक्षम नाही. दुचाकी आणि चारचाकी वाहने एकाच वेळी चौकात आल्याने गर्दीच्या वेळी येथे पूर्णपणे गोंधळाचे वातावरण निर्माण होते. कोणतीही शिस्तबद्ध यंत्रणा नसल्याने वाहने एकमेकांसमोर आडवी उभी राहतात आणि संपूर्ण चौक कोंडीत सापडतो.
---
‘सिग्नल’ : एकमात्र ठोस उपाय
या चौकात केवळ मानवी नियंत्रणावर अवलंबून राहणे अपुरे पडत आहे. चौकात कायमस्वरूपी ‘सिग्नल’ बसविल्यास सिग्नलच्या ठराविक वेळेमुळे पाइपलाइन रोड आणि कॅनॉल रोडवरील वाहने चौकात न अडकता सुरक्षितपणे पुढे जाऊ शकतील. ‘सिग्नल’मुळे आधी कोणी जायचे यावरून होणारे वाद, चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हरटेक’ करणे आणि होणारे किरकोळ अपघात थांबतील. नागरिकांना आणि स्थानिक रहिवासी, महिला व लहान मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित वेळ मिळेल.
डी मार्ट सर्कल येथे गर्दीच्या वेळी येणाऱ्या वाहनांची संख्या मोजून त्यानुसार सिग्नलची वेळ निश्चित करण्यासाठी तत्काळ सर्व्हे करावा. चौकात तत्काळ काउंटडाउन टायमरसह डिजिटल ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित करावेत. जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बसवली जात नाही, तोपर्यंत गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रित करण्यासाठी येथे वाहतूक पोलिस तैनात करावेत.
कोट...
करदात्या नागरिकांचा हक्क
सुरक्षित आणि गतिमान रस्ते मिळणे हा करदात्या नागरिकांचा हक्क आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका अडकून दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने येथे त्वरित सिग्नल बसवावेत.
- राकेश मुंडावरे, शहराध्यक्ष,
आयटी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष