अवतीभवती- धुळे टुडे २ साठी...
---
अशोक धात्रक यांचा
धुळ्यासह साक्री दौरा
धुळे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक १६ व १७ मेस धुळे शहर, धुळे ग्रामीण व साक्री तालुका दौऱ्यावर येत आहेत. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, पक्षाचा वर्धापन दिन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व प्रामुख्याने संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने श्री. धात्रक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. या दौऱ्यात १६ मेस सकाळी दहाला साक्री येथे तर सायंकाळी साडेचारला धुळे शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची धुळ्यात विश्रामगृहात बैठक होईल. या बैठकीस माजी आमदार अनिल गोटे, उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख भुपेंद्र लहामगे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख निंबा मराठे, जिल्हा संघटक प्रशांत भदाणे उपस्थित राहतील. १७ मेस धुळे तालुका व शहरात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितीचे आवाहन पक्षाचे महानगरप्रमुख धीरज पाटील, तालुकाप्रमुख बाबाजी पाटील, हेमराज पाटील, साक्री तालुका प्रमुख चंद्रकांत देसले, पिंपळनेर तालुकाप्रमुख तुषार गवळी, चंद्रकांत देवरे, किशोर राव, जिल्हा समन्वयक हिंमत सोनवणे, धुळे महानगरचे भरत मोरे, शेखर वाघ, संदीप सूर्यवंशी, अण्णा फुलपगारे, सुनील पाटील, जव्हार पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
---
पेपर लीकप्रकरणात
सरकारचे अपयश
धुळे : देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या नीट (NEET) परीक्षेचा पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे मेहनत करून परीक्षा देतात, मात्र अशा प्रकारच्या गैरव्यवहारामुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. याप्रकरणासाठी केंद्र सरकार आणि परीक्षा घेणारी संबंधित यंत्रणा थेट जबाबदार आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक मजबूत, जबाबदार आणि पारदर्शक यंत्रणा उभारावी, अशी मागणी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शेख मोहम्मद जायद यांनी केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत पेपर फुटणे हे सरकारच्या निष्काळजीपणाचे, प्रशासनिक अपयशाचे आणि परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे द्योतक आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा स्वतंत्र विशेष तपास यंत्रणेमार्फत निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी व सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
---