धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
लोगो छायाचित्र क्रमांक ः 19246
--
शाळांच्या ‘जिओ टॅगिंग’मध्ये धुळे जिल्हा पिछाडीवर
-
राज्य शासनाकडून १२७ शाळांची प्रक्रिया रखडल्याचा अहवाल; उद्दिष्टपूर्तीचे आव्हान
सकळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : शाळांची अचूक भौगोलिक माहिती संकलित करण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या ‘जिओ टॅगिंग’ प्रक्रियेत धुळे जिल्हा पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील १२७ शाळांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. विशेष म्हणजे १३ मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे दिलेल्या मुदतीत हे उद्दीष्ट पूर्ण झाले किंवा नाही याचा तपशील मिळू शकला नाही.
अकरा मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार केवळ धुळेच नव्हे तर शेजारील नाशिक जिल्हाही या प्रक्रियेत मागे आहे. नाशिकमधील १२२ शाळांचे जिओ टॅगिंग अद्याप झालेले नाही. संपूर्ण राज्यातून केवळ गडचिरोली आणि भंडारा या दोनच जिल्ह्यांनी शंभर टक्के काम पूर्ण केले आहे. राज्यातील दोन हजारहून अधिक शाळा अजूनही या प्रक्रियेत पिछाडीवर आहेत. ‘जिओ टॅगिंग’द्वारे शैक्षणिक धोरण आखणीसाठी शाळांच्या अचूक भौगोलिक स्थान निश्चिती करणासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे.
-
यूडायस प्लससाठी अनिवार्य
केंद्र शासनाच्या ‘यूडायस प्लस’ संकेतस्थळावर राज्यातील सर्व शाळांची भौतिक सुविधा, शिक्षक-विद्यार्थी संख्या आणि संगणकीय साधनांची माहिती नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र, शाळांचे नेमके स्थान, रस्ते, दोन शाळांमधील अंतर आणि परिसरातील शासकीय सुविधा यांची अचूक माहिती मिळवण्यासाठी आता ‘जिओ टॅगिंग’चा आधार घेतला जात आहे. यासाठी ‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर’शी करार करण्यात आला आहे.
-
प्रशासनाची नाराजी
जिल्ह्याचे जिओ टॅगिंगचे काम यापूर्वी ४० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या जिओ टॅगिंगमध्येही यापूर्वी नाशिक विभागात अशीच संथ गती पाहायला मिळाली होती, त्याचीच पुनरावृत्ती आता शिक्षण क्षेत्रात होताना दिसत आहे.
-
मुदत संपूनही प्रतीक्षाच
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझाडे यांनी १३ मेपर्यंत सर्व शाळांचे जिओ टॅगिंग पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही मुदत उलटूनही धुळ्यातील १२७ शाळांची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे की दुर्लक्षामुळे रखडली, याचा अधिकृत तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.
-