टुडे पान दोनसाठी
-----------------
महापौर आयुक्तांवर कडाडल्या
जिथे पैसा तेथेच प्रशासनाला इंटरेस्ट असल्याचा गंभीर आरोप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : महापालिकेतील भूसंपादनाची प्रकरणे, शहरातील विविध भूखंडांची माहिती याबाबत प्रशासनाने अडीच वर्षांत काहीच काम केले नाही. त्यामुळे जिथे पैसा तिथेच प्रशासनाला इंटरेस्ट असल्याचा गंभीर आरोप करीत महापौर दीपामाला काळे ह्या महापालिका आयुक्तांवर कडाडल्या.
भूसंपादन व विविध विकासाच्या विषयांवरून महापौरांसह नगरसेवकांना महापालिका प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले. महापालिकेला नुकतेच अटलांटा कंपनीला ११ कोटी रूपये अदा करावे लागले. आता तत्कालीन अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महापालिकेला जवळपास २०० कोटी रूपयांची देणी द्यावी लागणार आहेत. अडीच वर्ष प्रशासनाने याबाबत काहीही भूमिका न घेतल्याने महापौर काळे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. भूसंपादनाच्या प्रकरणांत न्यायालयीन लढाई लढत असताना महापालिकेच्या वकीलांची बाजू कमकुवत राहिल्यामुळेच महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी अशीच परिस्थिती राहिल्यास आयुक्तांवर अविश्वास आणावा लागेल, असा सूचक इशारा दिला.
विधी समिती बरखास्त
करा : दीपक सूर्यवंशी
ज्या विधी समितीमुळे महापालिकेला नुकसान सहन करावे लागत आहे, ती समिती बरखास्त करा, अशी मागणी दीपक सूर्यवंशी यांनी केली. नवीन सदस्यांची निवड करून समिती स्थापन करावी, असेही त्यांनी सांगितले. त्यावर महापौर काळे यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी अर्थ समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. हे दोन्ही प्रस्ताव तहकूब ठेवून समितीसाठी नाव सूचविण्याचे सांगितले.