‘मविप्र’चे माजी संचालक
ॲड. जी. एन. शिंदे यांचे निधन
नाशिक, ता. १४ : विधी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत व ‘मविप्र’ संस्थेचे माजी संचालक ॲड. गंगाधर नारायण शिंदे (वय ८०) यांचे निधन झाले. मूळचे वणसगाव (ता. निफाड) येथील रहिवासी असलेल्या ॲड. शिंदे यांनी आपल्या कारकीर्दीत विविध क्षेत्रांत ठसा उमटवला. १९८४ आणि १९८७ अशा दोन कार्यकाळांत त्यांनी ‘मविप्र’ संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले. संस्थेच्या ध्येयधोरणांना दिशा देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांना सहकार क्षेत्राचा वारसा वडील नारायण शिंदे यांच्याकडून मिळाला. नारायण शिंदे यांनी काकासाहेब वाघ आणि माधवराव बोरस्ते यांच्याबरोबर निफाड कारखान्यावर २५ वर्षे संचालक म्हणून काम केले होते. हाच वारसा पुढे चालवत ॲड. शिंदे यांनी जिल्हा सहकारी बँकेचे वैयक्तिक गटातून संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. १९८९ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ विधीज्ञ बाबूराव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये काम केले. विशेष गाजलेल्या खटल्यात ठाकरे यांचे सहकारी म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका विधी वर्तुळात आजही चर्चेत असते. माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे ते सासरे होत.
NSK26H19249