विरोधकांच्या भितीपोटी ऑनलाइन महासभा
महापौरांच्या निर्णयाला ठाकरे सेनेचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : येत्या बुधवारी (ता. २०) नियोजित महापालिकेची महासभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी जाहीर केले होते. मात्र या निर्णयाला शिवसेना (उबाठा) पक्षाने विरोध दर्शविला आहे. विरोधकांच्या भितीपोटी सभा ऑनलाइन घेतली जात असल्याचा आरोप गटनेते केशव पोरजे यांनी केला आहे.
आपली भूमिका मांडतांना पोरजे यांनी म्हटले आहे, की आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. ही कामे साठ ते सत्तर टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु कामे संथगतीने सुरू असून, दहा ते वीस टक्केच पूर्ण झाले आहेत. याबाबत सभागृहात विरोधीपक्ष आवाज उठवेल, म्हणून भितीपोटी सत्ताधाऱ्यांनी महासभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑनलाइन महासभेला विरोध असल्याचे पोरजे यांनी नमूद केले आहे. सदस्यांना त्यांचे मत व्यवस्थितपणे मांडता यावे, यासाठी ऑफलाइन पद्धतीनेच महासभा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-चौकट
कोरोनासारखी परिस्थिती नाही...
पत्रात पोरजे यांनी कोरोना परिस्थितीचा संदर्भ दिला आहे. तेव्हाच्या काळात परिस्थिती वेगळी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ऑनलाइन बैठका घेतल्या व उपाययोजनांसंदर्भात विविध सूचना केल्या होत्या. परंतु आता परिस्थिती तशी नसल्याने ऑफलाइन पद्धतीनेच महासभा घ्यावी, अशी मागणी केली आहे.