(जागेनुसार वापरावी)
---
यंदा तूर लागवड
स्थिर राहण्याचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : खानदेशातील तूर लागवड यंदा स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ ते १२ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खानदेशातील काही भाग तूर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. २०२३-२४ हंगामात तुरीला प्रतिक्विंटल तब्बल १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याने २०२४-२५ मध्ये तूर लागवडीत वाढ झाली होती. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली होती, तर संपूर्ण खानदेशातील लागवड क्षेत्र सुमारे १८ हजार हेक्टर होते.
मात्र यंदा तूर लागवडीत फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. खानदेशात कापूस हे प्रमुख पीक असून कापसाची लागवड कमी झाल्यासच शेतकरी तूर किंवा अन्य पिकांकडे वळतात. यंदा कापसाचा हमीभाव वाढला असून बाजारभावही स्थिर आहेत. त्यामुळे कापूस क्षेत्रात मोठी घट अपेक्षित नसल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात. दरम्यान, बागायती तूर लागवड काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर परिसर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि तळोदा भागात बागायती तूर लागवड केली जाते. अनेक शेतकरी कापसामध्ये आंतरपीक म्हणूनही तुरीचे उत्पादन घेतात.
खानदेशातील अनेक शेतकरी जून महिन्यात ठिबक सिंचनाच्या साहाय्याने बागायती तुरीची लागवड सुरू करतात. यंदा तिन्ही जिल्ह्यांत मिळून तूर लागवड १८ ते १९ हजार हेक्टरदरम्यान राहण्याचा अंदाज असून त्यात जळगाव जिल्ह्याचा वाटा अधिक राहणार आहे.