08830
नवापूर : येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी लागलेली रांग.
नंदूरबारला पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १४ : इंधनाची टंचाई निर्माण होण्याच्या भितीमुळे पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागताना दिसत आहेत. त्यातच काही पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल शिल्लक नसल्याचे फलक दिसू लागले आहेत. पुरवठा विभागाने याबाबत लक्ष घालून जनतेत जनजागृती करावी व साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.
पेट्रोल,डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याच्या भितीने पेट्रोल पंपांवर सध्या ग्राहकांची गर्दी वाढली आहे. त्यातच टंचाईबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याने इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न होत आहे. कंपन्यांकडून पुरवठा उशिरा झाला की, टँकर उशिराने पोहचतो. यामुळे एखाद्या पेट्रोल पंपांवरील इंधनसाठा संपला की इंधन शिल्लक नसल्याचा फलक लागलेला दिसतो. हा फलक पाहिल्यावर ग्राहकांमध्ये इंधन तुटवड्याची अफवा पसरत आहे. त्यातूनच जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा पहावयास मिळत आहे.
---------
गॅस सिलिंडरची बुकिंग वाढली
गॅस सिलिंडर नोंदणीचे प्रमाणही वाढले आहे. गॅस सिलिंडर नोंदणीसाठी शहरी भागाला ३० दिवस तर ग्रामीण भागाला ४५ दिवस देण्यात आले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सिलिंडरची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत ज्याच्याकडे लग्न सोहळा आहे, तोच लग्नपत्रिका जोडून पुरवठा विभागाकडे सिलिंडर मिळण्यासाठी अर्ज सादर करत आहे. कमी वेळेत जास्त नोंदणी होत असल्याने ग्राहकांना वेळेत सिलींडर मिळणे कठीण झाले आहे.
-----------
नवापूरला गर्दी
गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील पेट्रोल पंपांवर इंधनाची टंचाई निर्माण झाल्याने नवापूर शहरातील पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. गुजरातमधील सीमेलगतच्या अनेक गावांतील पंपांवर पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याने तेथील वाहनधारक मोठ्या संख्येने नवापूरकडे धाव घेत आहेत. तीव्र उन्हाची पर्वा न करता नागरिक तासन्तास रांगेत उभे राहून इंधन भरताना दिसत आहेत. परिणामी, नवापुरातील ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे तेथे प्रचंड ताण आला आहे.अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही पंपांवर तात्पुरता इंधनाचा तुटवडा जाणवत आहे.
पेट्रोल पंपांवर इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. एखाद्या पेट्रोल पंपांवर टँकर उशिराने पोहचतो. त्यामुळे इंधन उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत असते. टंचाईची कोणतीही परिस्थिती सध्या दिसत नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये. गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे.
- मोहितसिंग राजपूत, संचालक व्ही.जी.राजपूत पेट्रोलपंप