एन्कर
--
महापालिकेच्या नालेसफाईला मुहूर्त लागेना
प्रशासनाला कामाचा विसर; मॉन्सूनपूर्व कामे विलंबाने, शहर तुंबण्याची भिती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : महापालिका प्रशासनामार्फत मॉन्सूनपूर्व कामांना विलंबाने सुरुवात केली आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर होणार असल्याने, जोरदार पावसाने हजेरी लावल्यास शहर तुंबण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाले सफाईसह इतर कामांना गती देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
दरवर्षी मॉन्सूनला सुरुवात होण्याच्या किमान एक महिना आधी मॉन्सूनपूर्व कामांना सुरुवात केली जात असते. यामध्ये पावसाळी गटार, नाले स्वच्छता आदी कामे हाती घेतली जात असतात. गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील विविध ठिकाणी, चौकांमध्ये, सर्कलभोवती पावसाचे पाणी साचल्याचे व त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे प्रसंग वाढलेले आहेत. सद्यःस्थितीत शहरात ठिकठिकाणी रस्ते बांधणी, विकासकामे सुरु आहे. त्यामुळे शहरातील अर्धे रस्ते बंद स्थितीत आहे. दुसरीकडे सध्या कार्यरत रस्त्यांवर पाणी तुंबल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भिती व्यक्त केली जाते आहे. कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेअभावी काम विलंबाने सुरु केले असल्याचे सांगितले जाते आहे. परंतु प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची भिती निर्माण झाली आहे. तसेच सद्यःस्थितीत नाल्यांची व्यवस्थित स्वच्छता झालेली नसल्याने डासांचा उच्छाद अनेक भागांमध्ये झालेला आहे.
---चौकट
कामाला गती
देण्याची मागणी
यावर्षी मॉन्सूनचे आगमन लवकर होणार आहे. सुरुवातीपासून पावसाने जोर धरल्यानंतर नालेसफाई व इतर देखभाल दुरुस्तीची कामे करता येणार नाही. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कुमक घेत कामाला गती देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे.