‘जिल्हा नियोजन’ कडून निधी खर्चाचे नियोजन
पर्यटन, कृषी, औद्योगीक क्षेत्रावर भर; वनविभागालाही निधी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : जिल्ह्यासाठी सन २०२६-२७ करिता सर्वसाधारण वार्षिक योजनेतून ९६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी उपलब्ध होण्यापूर्वीच जिल्हा नियोजन समितीकडून त्याच्या खर्चाचे नियोजन सुरु झाले आहे. आगामी सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी वाढीव निधी देण्याची तयारी प्रशासन करीत आहे.
राज्य पातळीवरून चालु आर्थिक वर्षात सर्वसाधारणसाठी ९६५ कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पंधराही तालुक्यात प्राधान्याने हाती घ्यायची विकासकामांची यादी प्रशासनातर्फे तयार केली जात आहे. तसेच आगामी सिंहस्थाच्या अनुषंगाने पर्यटन वाढीसाठीही निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजनावरही भर दिला जातोय.
जिल्हा नियोजनामधून पर्यटन विभागासाठी सर्वाधिक १३० कोटी ३८ लाखांचा निधीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये येवला आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट सफारी सुरु करण्याचा प्रयत्न आहे. तसेच कश्यपी धरण परिसरात भगवान शंकर व गोदावरी नदी मातेची प्रतिकृती साकारताना तेथील बेटाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या व्यतिरिक्त कृषीकरिता ३९.९९ कोटी, औद्योगिक क्षेत्रासाठी १६.२५ कोटी, ऊर्जा क्षेत्रासाठी ७०.४७ कोटी तर वनविभागाला २१.१२ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
जिल्ह्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात सर्वसाधारणमधून ९०० कोटींचा निधी मंजूर होता. जिल्हा नियोजन समितीने केलेले नियोजनानुसार ३० मार्च रोजीच शंभर टक्के निधी खर्च झाला होता. त्याचधर्तीवर आता यंदाही पूर्ण क्षमतेने निधीच्या खर्चासाठी प्रशासनाने आत्तापासूनच नियोजन हाती घेतले आहे.