धुळे ः टुडे १ साठी......ॲंकर शेजारी उभी लावावी
--
अल्पवयीन मुलीवर अत्याचार;
नराधमास १० वर्षे सक्तमजुरी
-
वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावला
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला धुळे सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा गुरूवारी (ता. १४) सुनावली. विशेष सत्र न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. कल्पेश मधुकर सोनवणे (कोळी, वय २३) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
शिंदखेडा तालुक्यातील एका अल्पवयीन पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून आरोपी कल्पेश सोनवणे याने फूस लावून पळवून नेले होते. त्यानंतर तिच्यावर बाललैंगिक अत्याचार (पॉक्सो) केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २६ फेब्रुवारी २०२२ ला दोंडाईचा पोलिस ठाण्यात पॉक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक दिनेश मोरे यांनी या प्रकरणी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
-
न्यायालयीन कामकाज
सत्र न्या. यास्मीन देशमुख यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. विशेष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. शुभांगी जाधव यांनी सरकार पक्षातर्फे पीडिता, तिचे वडील, डॉक्टर, पंच आणि तपासी अंमलदार, अशा एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकिलांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी धरले.
-
न्यायालयाचा आदेश
न्यायालयाने आरोपी कल्पेश सोनवणे यास विविध कलमान्वये १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे दंडाच्या रक्कमेतील १० हजार रुपये पीडितेस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार दत्तू सूर्यवंशी, महिला हवालदार सुशीला वळवी, पवन अहिरे यांनी सहकार्य केले.