NSK26H19263
जळगाव : मृत नातीला मांडीवर घेऊन बसलेले आजोबा.
---
NSK26H19264 : सचिता बोरसे
---
बालिका मृत्यू प्रकरणात दोष केाणाचा?
---
जिल्हा रुग्णालय म्हणतेयं वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय; अधिष्ठांताचे कायद्यावरच बोट
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ ः पोलिओ लस घेतल्यानंतर बालिकेचा मृत्यू झाल्याने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने मृतदेह जळगावला पाठविला. मात्र, कुठलेही कागदपत्रे नसल्याचे कारण पुढे करीत वैद्यकीय महाविद्यालयाने मृतदेह घेण्यास नकार दिला. परिणामी, बालिकेचे आजोबा रात्रभर तिचा मृतदेह मांडीवर घेऊन बसून होते. या घटनेबाबत सर्वत्र नाराजी व्यक्त होत असताना, जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे कारवाईसाठी एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू आहे.
टाकळी प्र. चा. (ता. चाळीसगाव) येथील सैन्य दलातील जवानाची अडीचवर्षीय बालिका सचिता दीपक बोरसे हिचा पोलिओ डोस पाजल्यानंतर दोनच तासांत मृत्यू झाला. कुटुंबीयांनी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेला. येथील वैद्यकीय अधीक्षकांनी मृतदेहावर ‘इन-कॅमेरा’ शवविच्छेदन करणे अपेक्षित असल्याने मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना केला.
मृतदेह मांडीवर घेऊन काढली रात्र
रात्री सुमारे दोनच्या सुमारास आजोबा तुळशीदास मराठे नातीचा मृतदेह घेऊन जिल्हा रुग्णालयात पोहोचले. नातेवाइकांच्या आरोपानुसार, रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांचे कारण पुढे करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. परिणामी, निष्पाप चिमुकलीचा मृतदेह मांडीवर घेऊन आजोबांना रात्रभर शवविच्छेदन विभागाच्या गेटबाहेर बसून राहावे लागले. दुसऱ्या दिवशी काही सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घडला प्रकार पाहिल्यावर गोंधळ उडाला. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर देशभर या प्रकरणाचा धुराळा उडाला. अशा परिस्थितीत नेमकी चूक कोणाची? कारवाई कोणावर व्हायला हवी? या प्रश्नांची उत्तरे अद्याप प्रशासनाला उमगलेली नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा आपापसांत जुंपली आहे. या घटनेला २४ तास उलटूनही या प्रकरणात दोष कोणाचा, हे ठरविण्याऐवजी जो तो आपण कसे योग्य आहोत, हेच सांगत आहे.
---
कोट
राष्ट्रीय लसीकरण योजनेंतर्गत डोस पाजल्यानंतर बाळ व्यवस्थित खेळत होते. घरी गेल्यानंतर आईने दूध पाजले. झोळीत टाकले. नंतर दोन तासांनी बाळ दगावले. लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे असल्याने मृत्यूचे ठोस कारण शोधणे अपेक्षित आहे. त्यासाठी वैद्यकीय समितीसमोर शवविच्छेदन व्हावे लागेल. तशी सोय चाळीसगावला नाही, म्हणून तेथील अधीक्षकांनी जळगावला पाठविले ते योग्यच केले.
- डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव
---
कोट
मृतदेह ताब्यात घेतला नाही, हेच सर्वांचे म्हणणे आहे. मात्र, कोणालाही मृत्यूच्या कारणांवर बोलायचे नाही. एखादा मृताला रुग्णालयात आणल्यावर त्याच्यासोबत काहीतरी प्री-नोट चाळीसगाव रुग्णालयाने पाठविणे अपेक्षित आहे. नाहीच तर किमान पोलिसांचा पंचनामा तरी पाहिजे होता. त्याशिवाय मृतदेह कोणत्या कारणाने ताब्यात घेणार? बेकादेशीर कृत्य कसे करणार?
- डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता ः वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव