भरधाव दुचाकीच्या धडकेत
दुचाकीस्वाराचा मृत्यू
---
जळगाव रस्त्यावरील रामदेववाडीतील घटना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : जळगाव- पाचोरा रस्त्यावरील रामदेववाडी शिवारात मंगळवारी (ता. १२) रात्री झालेल्या दुचाकी अपघातात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर चंद्रकांत सोनवणे (वय २७, रा. नागदुली, ता. एरंडोल) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ज्ञानेश्वर सोनवणे मंगळवारी (ता. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या दुचाकीने जात होता. रामदेववाडी शिवारातील जंगल भागात एका वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीने ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. रस्ता वळणाचा असतानाही समोरून येणाऱ्या दुचाकीचालकाने वेगाने विरुद्ध बाजूने वाहन चालविल्याने हा अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वर सोनवणे याचा जागेवरच मृत्यू झाला. यात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, समोरील दुचाकीस्वार शुभम रवींद्र पाटील (रा. जवखेडा, ता. जळगाव) हाही जखमी झाला आहे. या प्रकरणी मृताचे काका महेंद्र तुकाराम सोनवणे (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत शुभम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.