अंबोली-वेळुंजे वळण योजनेस ४९ कोटींची मंजुरी
दमणगंगेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळणार; १६५ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण योजनेसाठी ४९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे १६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.
दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीवरील नाल्यावर ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. भौगोलिक रचनेमुळे पश्चिमेकडे वाहून जाणारे ३२.०४ दशलक्ष घनफूट पाणी या प्रकल्पाद्वारे अडवून ते गोदावरीच्या पूर्ववाहिनी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. यातील ४.८३ दशलक्ष घनफूट पाणी स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित २७.२१ दशलक्ष घनफूट पाणी प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यात सोडण्यात येईल.
निधीचे असे होणार वितरण
मंजूर निधीपैकी ४६ कोटी रुपये प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामांवर खर्च करण्यात येणार आहेत, तर ३.२६ कोटी रुपये आनुषंगिक कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
भूसंपादनासाठी १३.४६ कोटी, बांधकामासाठी २४.३३ कोटी आणि पुलाच्या कामासाठी ३.९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दळणवळण सुविधांसाठी ३.७० कोटी, इमारतींसाठी ३२ लाख, वृक्षारोपणासाठी १५ लाख आणि देखभाल-दुरुस्तीसाठी १२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.