खाकीचं स्वप्न अन् चिमुकलीचा अखेरचा श्वास
---
नाशिकला आलेल्या पोलिस मातेच्या चार महिन्यांच्या मुलीचा संशयित उष्माघाताने मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. १४ : आयुष्यातील दोन सुंदर स्वप्नं एकाच वेळी उराशी बाळगून प्रतीक्षा काटेकर जगत होत्या. एक म्हणजे महाराष्ट्र पोलिस दलात ‘खाकी’ वर्दी परिधान करण्याचं स्वप्न... आणि दुसरं म्हणजे आपल्या चार महिन्यांच्या चिमुकलीचं संगोपन. पण, नियतीने एका क्षणात हे सगळं हिरावून घेतलं.
गोथंडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शुभम व प्रतीक्षा काटेकर हे दांपत्य बुधवारी (ता. १३) चार महिन्यांच्या मुलीसह नाशिकला आले होते. सामनगाव रोड परिसरातील एका लॉन्सवर त्यांच्या नातेवाइकांचा विवाहसोहळा होता. वऱ्हाडाबरोबर खासगी ट्रॅव्हल्सने ते नाशिककडे रवाना झाले.
राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. कडक उन्हातून झालेला लांबचा प्रवास सर्वांसाठीच त्रासदायक ठरत होता. प्रवासादरम्यान चिमुकली खेळत होती; मात्र दिवस सरत असताना ती काहीशी सुस्तावल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले होते.
दरम्यान, लग्नघरात आनंद, गडबड आणि तयारीची लगबग सुरू होती. रात्री उशिरापर्यंत विवाहसोहळ्याचे वातावरण रंगले होते. मात्र, उकाड्याने सर्वच हैराण झाले होते.
पहाटे चारच्या सुमारास प्रतीक्षा यांना जाग आली. कुशीत झोपलेल्या आपल्या चिमुकलीकडे त्यांनी पाहिले... पण, तिच्याकडून कोणतीच हालचाल होत नव्हती. क्षणात त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. घाबरलेल्या आईने कुटुंबीयांना आवाज दिला. सर्वांनी तातडीने चिमुकलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. एका क्षणात लग्नाचा आनंद शोकात बदलला. वऱ्हाडावर दुःखाची सावली पसरली.
प्राथमिक माहितीनुसार, प्रखर उष्णतेमुळे चिमुरडीला उष्माघाताचा फटका बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
मातृत्वासाठी पुढे ढकलली होती रुजू होण्याची तारीख
प्रतीक्षा काटेकर यांची नुकतीच महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली होती. मुंबई विभागात प्रशिक्षणासाठी त्यांना रुजू व्हायचे होते. मात्र, आपल्या चिमुकलीच्या संगोपनासाठी त्यांनी काही दिवसांची मुदत मागून घेतली होती. ‘खाकी’ वर्दी परिधान करून समाजरक्षण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुण मातेवर अखेर स्वतःच्या लेकराला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.