जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे
वाहन शेअरिंग; आवाहनाला साद
सामान्य प्रशासन विभागाने काढले पत्रक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : इंधन बचतीच्या पंतप्रधानांच्या आवाहानाला साद देत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आता शेअरिंग वाहनाचा वापर सुरू केला आहे. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांनी पत्रक देखील काढले आहे.
अनेक शासकिय कार्यालयांमध्ये देखील आता शासकिय वाहनांचा वापर न करता इलेक्ट्रीक वाहन व दुचाकीचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी देखील आता याची सुरवात केली आहे. कार्यालयीन कामानिमित्त नियोजितस्थळी भेटीसाठी कमीत कमी वाहनांचा वापर करावा. अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करतांना कार पुलिंगद्वारे प्रवास करावा. अधिकारी व कर्मचारी यांनी सद्यस्थितीत कार्यालयीन कामकाजासाठी दौरे आवश्यक असल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. सर्व बैठका, चर्चासत्रे, प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने आयोजित कराव्यात आदी मार्गदर्शक प्रणाली शासकीय, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जाहिर करण्यात आली आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासनातर्फे पत्रक काढून याबाबत सूचित करण्यात आले आहे.
––––