जूनपासून पालकांच्या खिशाला कात्री
जागतिक युद्धाचे सावट आणि इंधन दरवाढीचा चटका आता थेट शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला बसणार आहे. नाशिकसह शहरी भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने खासगी स्कूल व्हॅन, रिक्षा आणि बसचालकांनी दरवाढीचे संकेत दिले आहेत. यामुळे जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. इंधन दरवाढीसोबतच वाहनांचा देखभाल खर्चही वाढल्याने वाहतूकदारांपुढे पेच निर्माण झाला असून, प्रतिविद्यार्थी किमान २०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
*इंधन दरवाढ : घाऊक बाजारात डिझेल ३.११ रुपये आणि पेट्रोल ३.१४ रुपयांनी महागल्याने वाहतूक खर्चात वाढ
*फीमध्ये वाढ : प्रतिविद्यार्थी शालेय बस किंवा व्हॅनच्या फीमध्ये किमान २०० रुपयांपासून वाढ होणार
*अंतरावर आधारित शुल्क : घरापासून शाळेचे अंतर किती आहे, यानुसार वाहतूक शुल्काची पुनर्रचना होणार
* गणित बिघडले : इंधनासोबतच विमा, स्पेअर पार्ट्स, देखभाल खर्च आणि चालकांचे मानधन वाढल्याने दरवाढ अपरिहार्य असल्याचे चालकांचे म्हणणे
* पालकांवर आर्थिक भार : मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मासिक बजेटवर या दरवाढीचा थेट परिणाम होणार
* समन्वयाची गरज : अनेक ठिकाणी पालक आणि चालक यांच्यात समन्वयाने फी ठरते, मात्र नव्या दरांमुळे वादाची चिन्हे
* अवलंबित्व : बहुतांश विद्यार्थी खासगी व्हॅन, रिक्षा आणि मिनी बसवर अवलंबून असल्याने या निर्णयाचा मोठा परिणाम होणार
---कोट
एप्रिल आणि मे महिना खूप कसरतीचा होता. पेट्रोल आणि गॅस मिळण्याचे वांदे झाले असून, पेट्रोल-डिझेल महागले आहे. त्यामुळे व्हॅनच्या फीमध्येही वाढ करावी लागणार आहे. दर विद्यार्थ्यांमागे किमान २०० रुपये वाढवले तरच सर्व खर्च निघणार आहे.
-रवींद्र अस्वले, स्कूल व्हॅनचालक