‘दिवाणी न्यायाधीश’ परीक्षेत
कीर्ती बागूल राज्यात प्रथम
मविप्र विधी महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनीचे यश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : येथील कीर्ती बागूल हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर परीक्षेत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मविप्र संस्थेच्या विधी महाविद्यालयाची ती माजी विद्यार्थिनी आहे.
कीर्ती बागूल हिने विद्यार्थिदशेपासूनच न्यायव्यवस्थेत उच्च स्थान मिळविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. महाविद्यालयात प्रथम वर्षापासून तिने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा सुरू केला. प्रखर जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने हे यश संपादन केले. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कीर्तीची यशस्वी कामगिरी साजरी करताना मविप्र विधी महाविद्यालयातर्फे तिचा विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्या डॉ. संध्या गडाख तिचे कौतुक करताना म्हणाल्या, की कीर्तीने मिळविलेले यश म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे. या सत्कारप्रसंगी डॉ. शिल्पा गांगुर्डे, डॉ. निवेदिता जाधव, डॉ. जान्हवी झांजे, प्रा. शीतल पिंगळे आदी उपस्थित होते.
मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी आदींनी कीर्तीचे अभिनंदन केले आहे.
NSK26H19269
नाशिक : दिवाणी न्यायाधीश परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या कीर्ती बागूल हिचा सत्कार करताना प्राचार्या डॉ. संध्या गडाख. शेजारी प्राध्यापकवृंद.