मेन फिचर
NSK26H19270
जळगाव : वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत हुडको पिंप्राळा वीज उपकेंद्रावर गुरूवारी रात्री संतप्त नागरिकांची झालेली गर्दी.
........
संतप्त नागरिक मध्यरात्री धडकले वीज उपकेंद्रावर
सलग चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा विस्कळीत; फोन ‘नॉट रिचेबल’
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : शहरातील तापमानाचा पारा ४५ अंशांवर पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले असतानाच गेल्या चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. रात्री नऊपासून पहाटेपर्यंत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे अनेक भागांतील नागरिकांना अक्षरशः जागून रात्र काढावी लागत आहे. त्यात ‘महावितरण’चे कर्मचारी फोन उचलत नसल्याने संतप्त नागरिक थेट वीज उपकेंद्रावर जावून धडक देत आहेत.
जळगाव शहरात विशेषत श्यामनगर, हरिवीठ्ठल नगर, वाघनगर, जिजाऊ नगर, पिंप्राळा परिसरातील खंडेरावनगर, मयूर कॉलनी, हुडको, सोनीनगर, ओमपार्क नगर, गणपतीनगर, संत मीराबाई नगर, केदारनगर, निसर्ग कॉलनी, सेंट्रल बँक कॉलनी, विद्यानगर तसेच एसएमआयटी परिसरातील भिकमचंद जैन नगर आणि गुड्डू राजानगर या भागांत रात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक ठिकाणी तीन ते चार तास वीज नसल्याने घरातील उकाडा असह्य झाला होता. त्यामुळे काही नागरिकांनी घरांच्या छतावर तर काहींनी घराबाहेर बसून रात्र काढल्याचे चित्र दिसून आले.
फोन नॉट रिचेबल
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी संबंधित उपकेंद्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वेळा फोन क्रमांक ‘नॉट रिचेबल’ लागत असल्याने ग्राहकांची अधिकच गैरसोय झाली.
कर्मचाऱ्यांवर संताप
दरम्यान, हुडको-पिंप्राळा वीज उपकेंद्रांतर्गत श्यामनगर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने गुरूवारी नागरिकांचा संयम सुटला. जळालेले रोहित्र बदलवूनही समस्या कायम असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी मध्यरात्री पिंप्राळा-हुडको उपकेंद्रावर धडक दिली. श्याम नगरातील गट क्रमांक १२४ आणि १२५ मधील फ्यूज कर्मचारी बंद करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
रात्र डीपीजवळ
यावेळी नागरिकांनी कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करून खंडित वीजपुरवठामुळे दररोज डीपीजवळ रात्र काढावी लागत आहे. वीजपुरवठा कधी सुरळीत करणार, याचे उत्तर मात्र कोणीच देत नसल्याने नागरिकांना यावेळी संताप व्यक्त केला.
चौकट
उपकेंद्रात पोलिस पथक
हुडको उपकेंद्रात नागरिकांची गर्दी वाढत असल्याने महावितरणचे अधिकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे हे आले. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही उपकेंद्रावर येऊन महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपकेंद्र परिसरात मोठी गर्दी झाल्याने रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व संतप्त नागरिकांना शांत केले.